LIVE UPDATES

विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

सावंतवाडी मतदारसंघात ५० वनराई बंधाऱ्यांच्या महाअभियानाचा वेतोरेतून शुभारंभ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 02, 2026 13:54 PM
views 277  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

वेंगुर्ला :  भविष्यातील दुष्काळाच्या संभाव्य सावटावर मात करण्यासाठी आणि जलसंवर्धनाला गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या महाअभियानाचा भव्य शुभारंभ आज २ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे - गुरव टेंबवाडी येथे संपन्न झाला.

 ​वाढदिवसाचा केवळ औपचारिक उत्सव न साजरा करता जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला आहे. आजच्या शुभारंभप्रसंगी युवा नेते विशाल परब यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून पहिल्या वनराई बंधाऱ्याचे काम करत या अभियानाचा प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी परिसरातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्थानिक शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावरच न्याहारीचा आस्वाद घेतला. विशाल परब यांच्या या साधेपणाचे आणि आपुलकीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

   ​‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा नारा

सावंतवाडी मतदारसंघातील विविध गावांमध्ये टप्प्याटप्प्याने ५० वनराई बंधारे उभारले जाणार आहेत. या माध्यमातून पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळी वाढवणे आणि उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मतदारसंघातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने विशाल परब यांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असून, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

 ​वेतोरे येथे पार पडलेल्या या शुभारंभ सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेटये, सदानंद गिरप, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, वेतोरा सरपंच प्राची नाईक, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, माजी तालुकाध्यक्ष बाळा सावंत, शैलेश जामदार, समिर कुडाळकर, शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे, बूथ अध्यक्ष विरोचन धुरी, दीपक करंगुटकर, आबा येरम , सूर्याजी नाईक, ग्रा प सदस्य विक्रम सावंत, ताता गावडे, एसटी प्रवासी संघटनेचे श्री वेतोरकर, प्रशांत नाईक, राजेश सामंत, संतोष पेडणेकर, सुनील गडेकर, सुनील घाग यांच्यासाहित स्थानिक ग्रामस्थ, तरुण वर्ग, भाजप कार्यकर्ते आणि जलसंधारण क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.