
कुडाळ : अनाथ, मतीमंद, वृद्ध आणि निराधारांना हक्काचा आधार देणाऱ्या पणदूर येथील 'संविता आश्रम'चा १३ वा वर्धापन दिन आज अत्यंत उत्साहात पार पडला. गेल्या १३ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या सेवाकार्याचे प्रशासकीय स्तरावरून कौतुक करण्यात आले असून, "संविता आश्रम हे केवळ संस्था नसून निराधारांचे हक्काचे घर आहे," असे गौरव उद्गार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढले.
संस्थेचे संचालक संदीप परब यांनी या सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. आजच्या काळात अनेकदा मुले आई-वडिलांना सांभाळण्यास नकार देतात, ही समाजाची मोठी शोकांतिका आहे. मात्र अशा कठीण परिस्थितीत बेघर, निराधार वृद्ध आणि अनाथ मुलांना या आश्रमरुपी वृक्षाची भक्कम सावली मिळत आहे. सध्या आश्रमात अनेक अनाथ मुले, मतीमंद व्यक्ती व वृद्ध एकत्र राहत असून, आश्रमात मुलांच्या शिक्षणापासून ते वृद्धांच्या आरोग्याची उत्तम प्रकारे काळजी घेतली जात आहे.
कार्यक्रमाच्या मुख्य पाहुण्या म्हणून बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, "जिल्ह्यात एखादे बेवारस किंवा लहान मूल सापडल्यास पोलिसांचा सर्वात पहिला विश्वास संविता आश्रमावर असतो. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अशा घटकांची संपूर्ण जबाबदारी हा आश्रम अत्यंत प्रेमाने आणि विश्वासाने स्वीकारतो. निराधारांना आसरा देऊन त्यांना एकाच कुटुंबाप्रमाणे एकत्र ठेवणे सोपे काम नाही, परंतु संदीप परब आणि त्यांची टीम हे कार्य अतिशय योग्य पद्धतीने पार पाडत आहे. जिल्हा प्रशासन म्हणून या आश्रमाला कायमच सर्वतोपरी सहकार्य केले जाईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सोहळ्यास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार सचिन पाटील, पत्रकार शेखर सामंत, संस्था ट्रस्टी स्थानिक नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि आश्रमातील सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या १३ वर्षांच्या या अखंड सामाजिक सेवेबद्दल उपस्थितांनी संविता आश्रमाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.










