
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी बंधारे बांधण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पाणी साठवणूक आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. येत्या १० ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांची बांधणी पूर्ण केली जाईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांनी दिली आहे.
कमी पावसामुळे भाताचे पीक मुळातच अडकून पडल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे, तसेच पुढील रब्बी व उन्हाळी हंगामातील कुळीथ, मूग आणि भुईमूग या पिकांसाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येत बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला.
पिंगुळी (ता. कुडाळ) येथे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येत पोती व मातीच्या साहाय्याने वनराई बंधारा बांधणीचे काम हाती घेतले आहे. या लहान बंधाऱ्यांमुळे पाणी साठून ते जमिनीत मुरण्यास मदत होईल आणि विहिरी तसेच भूजलाची पातळी टिकून राहून पुढील पिकांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास स्थानिक महिला शेतकरी उदया उल्हास धुरी यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे, कुडाळचे कृषी अधिकारी भास्कर चौगुले, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पिंगुळीचे सरपंच अजय केरकर, स्थानिक पोलिस पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










