
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ३३ वर्षाच्या पत्रकारीतेतील अनुभवी, शांत, संयमी, सकारात्मक पत्रकारीकता करणारे जेष्ठ निष्कलंक पत्रकार के. जी. गावडे (६५) यांचे गोवा-बांबळी रूग्णालयात औषधोपचार सुरू असताना रविवारी पहाटे निधन झाले. वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपद, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्यपद, तसेच तंटामुक्त अभियान स्पर्धेतील शासनाचा पुरस्कार या शिवाय जिल्हा व तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार, तसेच विविध स्तरावर उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार त्यांनी प्राप्त केले होते.
एखादा नवीन तरूण पत्रकारीकतेत आला तर त्याला पत्रकारीकता कशी करावी. याचे ते मार्गदर्शन करीत असत. वेंगुर्ले तालुक्यातील पत्रकारांसाठी ते गुरूवर्य होते. गेल्या दोन वर्षात त्यांनी पत्रकारीतेत सातत्य ठेवले नसले तरी ते पत्रकारांच्या कार्यक्रमांस उपस्थित राहून पत्रकारांना मार्गदर्शन करीत होते. जागृती कला क्रीडा- सांस्कृतिक मंडळ, संत लालाजी मंडळ मठ या माध्यमातून कला, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम भरवून शालेय मुलां बरोबरच सर्वांना त्या त्या क्षेत्रात उत्तेजन मिळण्यासाठी ते प्रोत्साहन देत असत.
रविवार सकाळी के. जी. गावडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच केवळ पत्रकार नव्हेत तर शासकिय, निमशासकिय, विविध संस्था, मंडळे. सहकारी संस्था, तसेच मित्रपरीवारांतून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी पत्रकारांबरोबरच विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी उपस्थित दर्शवत के. जी. गावडे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, १ मुलगी, भाऊ, भाजवया, पुतणे असा परीवार आहे.










