LIVE UPDATES

७५८ पीडितांना 'सखी वन स्टॉप सेंटर'ने सावरले

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 06, 2026 14:41 PM
views 6  views

सिंधुदुर्गनगरी : कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ किंवा विविध प्रकारच्या संकटात सापडलेल्या महिलांसाठी 'सखी वन स्टॉप सेंटर' हे एक महत्त्वाचे सुरक्षा कवच ठरत आहे. महाराष्ट्रात सध्या ६८ 'सखी' केंद्रे कार्यरत असून २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षाच्या कालावधीत राज्यभरात २६,०१९ महिलांना या केंद्रांद्वारे तातडीची मदत व सहारा देण्यात आला आहे. येथील महिला व बाल कल्याण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या सखी वन स्टॉप सेंटरने गेल्या पाच वर्षांत हजारो महिलांना सावरले आहे. पीडित महिलांना आधार देण्यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात सखी वन स्टॉप सेंटर सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सखी केंद्राने गेल्या सहा वर्षात (१५ जुलै २०२० ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत) ७५८ महिलांना आधार देत त्यांना मदत केली आहे.

महिलांना सखी सेंटरमध्ये कोणत्या सेवा-सुविधा ?

सखी वन स्टॉप सेंटरतर्फे २४ तास तातडीची वैद्यकीय आणि पोलिस मदत. पीडित महिला आणि तिच्या मुलांसाठी सुरक्षित निवास. मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशकांचे मार्गदर्शन, कायदेशीर सल्ला आणि विनामूल्य वकील सेवा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

काय आहे 'सखी वन स्टॉप सेंटर'?

केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत संकटात सापडलेल्या, हिंसाचारग्रस्त आणि पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यासाठी 'सखी वन स्टॉप सेंटर' ही योजना सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणी सखी केंद्रे कार्यरत

 प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटर कार्यरत असले तरीही पीडित महिलांना कायद्याने संरक्षण मिळावे, या हेतूने प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला कक्ष कार्यरत असतो. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातही विशेष महिला कक्ष कार्यरत असून इथेही अशा महिला न्याय मागू शकतात.

पाच दिवस मुक्कामासह खाण्या-पिण्याची सोय

ज्या पीडित महिलांना स्वतःचे घर सोडावे लागते किंवा तात्पुरता आसरा नसतो, अशा महिलांची सखी सेंटरमध्ये पाच दिवसांपर्यंत राहण्याची मोफत सोय केली जाते. या काळात महिला आणि त्यांच्या लहान मुलांसाठी भोजन, कपडे आणि वैद्यकीय काळजीची संपूर्ण जबाबदारी केंद्र उचलते.

पोलिसांची मदत आणि वकिलांचाही सल्ला

अनेकदा महिलांना पोलिस ठाण्यात जाण्याची किंवा न्यायालयात दाद मागण्याची भीती वाटते. सखी सेंटरमध्ये महिलांना विनात्रास सेंटरमधूनच पोलिस तक्रार दाखल करण्यास मदत केली जाते. तसेच विनामूल्य विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अनुभवी वकिलांचा सल्ला व न्यायालयीन लढ्यासाठी मदत पुरवली जाते.