LIVE UPDATES

गरजूंच्या मदतीतून ‘घेणारा’ हात ‘देणारा’ व्हावा : पालक न्यायमूर्ती न्या. श्याम चांडक

वस्तूवाटप शिबिरात विविध साहित्याचे वितरण
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 06, 2026 14:24 PM
views 9  views

सिंधुदुर्गनगरी : जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला आशेची गरज असते. गरजू व्यक्तींना मदतीचा हात देतानाच त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून भविष्यात ‘घेणारा’ हात ‘देणारा’ व्हावा, यासाठी सामाजिक संस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून याच दिशेने सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती न्या. श्याम चांडक यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग आणि हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, मालाड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुनीती सभागृहात शनिवारी (५ सप्टेंबर) वस्तूवाटप शिबिर झाले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, महिलांना शिलाई मशीन, दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर व श्रवण यंत्र तसेच वैद्यकीय खाटा, धुण्याची यंत्रे, पंखे, दिवे, विद्युत संच, जनित्र, पाण्याचे पंप आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी पालक न्यायमूर्ती न्या. फरहान दुबाश, न्या. अमित जामसंडेकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे, ॲड. परिमल नाईक, ॲड. संदीप राणे, हेतू ट्रस्टचे सचिव रिखब जैन, एम. एस. कवाड ट्रस्टचे विकास कवाड यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी व लाभार्थी उपस्थित होते. न्या. चांडक म्हणाले, जीवनात आशा आणि त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. गरजूंच्या गरजा पूर्ण करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने केले आहे. या कार्यातून समाजासाठी आदर्श निर्माण झाला आहे.

विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. आर. व्ही. नडगदल्ली यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सर्वांना न्याय मिळावा यासाठी विधी सेवा प्राधिकरण कार्यरत आहे. आता न्यायापुरते मर्यादित न राहता समाजसेवेची शाल पांघरून गरजूंसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्गनगरीला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाल्याने तयार झालेला सातबारा न्यायालयाला सुपूर्द करण्यात आल्याची माहिती दिली. हेतू ट्रस्टचे सचिव रिखब जैन यांनी धनवान आणि गरजू यांच्यात सेतू निर्माण करण्याचे काम संस्था करत असल्याचे सांगितले. माजी न्यायाधीश कमलकिशोर तातडे यांनी गरजूंना मदत करून त्यांना स्वावलंबी करण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे आभार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. सुधीर देशपांडे यांनी मानले.