LIVE UPDATES

मातोंडच्या उपसरपंचपदी वैभवी परब बिनविरोध

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 20, 2026 21:41 PM
views 28  views

वेंगुर्ला : मातोंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैभवी परब यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले. संघटनेत ठरल्या प्रमाणे माजी उपसरपंच आनंद परब यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा पंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा  आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंचपदासाठी भाजपच्या वैभवी परब यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जाच्या सूचक म्हणून सदस्य किशोरी परब यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर महायुतीच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने अर्जास मंजुरी दिली. निवडणूक अधिकारी म्हणून पंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे यांनी निवड प्रक्रिया पार पाडली.

निवडीनंतर पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल, पाल गावचे भाजप शक्ती केंद्रप्रमुख कमलेश गावडे, सरपंच मयुरी वडाचेपाटकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, दिपेश परब, किशोरी परब, सुजाता सावंत, विशाल बागायतकर, आर्या रेडकर, किरण मातोंडकर  तसेच भाजप नेते जगदीश परब, नंदू परब, संतोष सावंत, सायमन आल्मेडा, मारुती दौडशनट्टी आणि  शिवसेना-भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वैभवी परब यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनामुळे महायुतीची एकजूट कायम राहिली आणि उपसरपंचपदाची निवड बिनविरोध करण्यात यश आल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती अभेद्य राखण्यात यश मिळाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नवनिर्वाचित उपसरपंच वैभवी परब यांनी ग्रामविकासाला प्राधान्य देत सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही दिली.