LIVE UPDATES

कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांचा 'कर्तव्यदक्ष अधिकारी' म्हणून सन्मान

दैनिक कोकणसादच्या वर्धापन दिनाचे औचित्य
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 21, 2026 11:48 AM
views 185  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांचा कोकणसाद दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त 'कर्तव्यदक्ष अधिकारी' म्हणून सन्मान करण्यात आला. सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कोकणसाद संचालक संजय ढवळीकर संपादक सागर चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गौरी पाटील यांनी कणकवली शहरात प्रशासन अधिक गतिमान करत स्टॉलमुक्त कणकवली आणि अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबवली. शहरातील सार्वजनिक रस्ते व पदपथ मोकळे करण्यासाठी धाडसी निर्णय घेतानाच फळविक्रेते, भाजीविक्रेते आणि फुलविक्रेते यांचेही नियोजनबद्ध पुनर्वसन करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करून व्यवसायावर परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेतली.प्रशासनातील शिस्त, पारदर्शक कारभार, नागरिकाभिमुख निर्णय आणि शहराच्या सुशोभीकरणासाठी सातत्याने घेतलेल्या पुढाकारामुळे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी कणकवलीकरांची मने जिंकली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत कोकणसाद दैनिकाने त्यांना 'कर्तव्यदक्ष अधिकारी' हा सन्मान प्रदान केला असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.