
कणकवली : तळेरे येथे अवैध गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी सोमवारी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत साडेसहा लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, दारूसह बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 14 लाख 52 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध गोवा बनावटीच्या दारूविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाईचा धडाका सुरु ठेवला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कणकवली तालुक्यातील तळेरे येथून साडेसहा लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. या कारवाईत दारूसह बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 14 लाख 52 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सोमवारी 20 जुलै रोजी सकाळी सुमारे 7.50 वाजता तळेरे-वाघाचीवाडी, ता. कणकवली येथे करण्यात आली. पोलिसांनी 6 लाख 52 हजार 800 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू तसेच 8 लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप असा एकूण 14 लाख 52 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित संदीप शंकर चव्हाण (वय 36, रा. तळेरे-वाघाचीवाडी, ता. कणकवली), तेजस भांबुरे (रा. तळेरे) आणि सागर डंबे (रा. तळेरे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल डिसोझा, घोनसल्विस, जामदार तसेच पोलीस कॉन्स्टेबल समजिस्कर व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधातील कारवायांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेग दिला असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.










