
दोडामार्ग : नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि भारत सरकारने तो स्वीकारावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात यावी, या मागणीचे निवेदन दोडामार्ग तालुक्यातील जागरूक नागरिकांच्या वतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, दिल्ली येथील जंतर-मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणासह शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दीर्घकालीन उपोषण सुरू केले. या आंदोलनाला सुमारे वीस दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत अद्याप सकारात्मक संवाद झाल्याचे दिसून येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
देशातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला मोठा धक्का बसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित खात्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. तसेच, भारत सरकारनेही लोकभावना आणि लोकशाही मूल्यांचा आदर राखत त्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शांततामय आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होणे ही चिंताजनक बाब असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांचे प्रश्न, नागरिकांच्या भावना आणि लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. तहसीलदारांनी हे निवेदन भारत सरकार व संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे तातडीने पाठवून नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी निश्चित करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या जबाबदारीचा विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याची शिफारस करावी, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.
या निवेदनावर राष्ट्र सेवा दल सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. प्रविण नाईक, दोडामार्ग तालुका हेल्पलाइनचे राजू ठाकूर, ठाकरे शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबू गवस, राष्ट्र सेवा दल दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुचन कोरगांवकर, वझरे-गिरोडे माजी सरपंच विष्णू(सागर) नाईक, कळणे माजी सरपंच मनोहर फक्रोजी देसाई, नंदकिशोर प्रसादी, विष्णू दळवी, भिवा गवस, गोविंद शिरोडकर आणि कल्पेश करमळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.










