LIVE UPDATES

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने विलवडे येथे अपघात

भरधाव कारची वीज खांबाला धडक : रस्ता वाहतुकीस योग्य करण्याची वाहनधारकांची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 20, 2026 18:11 PM
views 50  views

सावंतवाडी : बांदा-दाणोली मार्गादरम्यान असलेल्या विलवडे येथे खराब रस्त्यामुळे कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सुसाट वेगाने जाणारी फोर्ड कंपनीची कार खड्ड्यात गेली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ती थेट रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, यामुळे रस्त्यावरील विद्युत खांब एका बाजूने कलंडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथील पाच पर्यटक फोर्ड कंपनीच्या कारने गोवा येथून आंबोलीच्या दिशेने प्रवास करत होते. गुरुवारी दुपारी विलवडे हायस्कूलजवळ कार आली असता रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी जाऊन थेट विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात गाडीतील चारही पर्यटक सुदैवाने बालंबाल बचावले असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

रस्ता वाहतुकीस योग्य करण्याची वाहनधारकांची मागणी

सध्या या जिल्हा मार्गाच्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नूतनीकरण प्रलंबित असलेल्या ठिकाणी सध्याच्या दयनीय रस्त्याची तातडीने डागडुजी करून हा मार्ग वाहतुकीस सुरळीत आणि योग्य करावा, अशी जोरदार मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आहे.