
देवगड : तालुक्यातील कुणकेश्वर तळेवाडी परिसरातील समुद्र किनारपट्टीवरून बेकायदेशीर वाळू चोरी करणाऱ्या दोन टेम्पोधारकांना स्थानिक ग्रामस्थांनी रंगेहात पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी घडली. याबाबतची पुढील कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.
उपलब्ध माहितीनुसार, समुद्रातील वाळूचा उपसा व वापर करण्यास शासनाने बंदी घातलेली असतानाही वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. सोमवारी अशाच प्रकारची अवैध वाळू वाहतूक कुणकेश्वर तळेवाडी परिसरातील समुद्र किनारपट्टीवरून होत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी सतर्कतेने ही वाहतूक रोखली. तेथे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या दोन टेम्पोधारकांना स्थानिक नागरिकांनी रोखत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. कुणकेश्वरचे तलाठी ए. जी. नाईक यांनी दोन्ही टेम्पो ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली असून सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.










