LIVE UPDATES

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वारंवार वीज पुरवठा खंडित | नागरिक त्रस्त

आडेली जि. प. मतदार संघातील सरपंचांनी विचारला वीज वितरण अधिकाऱ्याना जाब
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 03, 2026 20:53 PM
views 83  views

वेंगुर्ला : यावर्षी पाऊस उशिरा सुरू होऊन सुद्धा पावसाळ्यात पूर्वी करावयाची कामे काही ठिकणी विद्युत वितरण विभागाने न केल्याने आता पावसाळ्यात झाडाच्या फांद्या पडून वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आज शुक्रवारी (३ जुलै) भाजप सरपंच पपु परब, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांच्यासहित तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व सरपंचांनी विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट घेऊन जाब विचारला. दरम्यान या सर्व त्रुटी दूर करू वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास एकही ग्राहक वीज बिल भरणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे दिला. 

गेले काही दिवस वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नेमकी काय समस्या आहे हे विचारायला फोन केल्यास उपविभागीय कार्यालयातील फोन बंद असतात. याकारणामुळे आज लोकप्रतिनिधीनी कुडाळ विद्युत वितरण विभागीय कार्यालयाला भेट देत कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना जाब विचारला. ११ केव्ही व ३० केव्ही लाईन मध्ये असणाऱ्या सर्व त्रुटी दूर करा. प्रत्येक गावाला एक स्वातंत्र्य वायरमन द्या. पावसाळ्यापूर्वी करावयाची झाडी मारणे, जुने वीज खांब बदलणे आदी उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.  यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांच्यासहित पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, आडेली सरपंच यशस्वी कोंडस्कर, वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, मठ सरपंच रुपाली नाईक, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, वेतोरे सरपंच प्राची नाईक, सचिन राऊळ, भाजप बूथ अध्यक्ष आबा येरम, शक्ती केंद्रप्रमुख सुधीर गावडे, तात्या कोंडस्कर, ज्ञानेश्वर लटम, विकास अणसुरकर, दीपक मोहिते, सुनील नाईक, आडेली तंटामुक्त अध्यक्ष तोरस्कर, प्रविण गावडे यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी येत्या ४ दिवसात उपविभागीय कार्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रात्रपळीवर कर्मचारी ठेवण्यात येईल. तसेच इतर उर्वरित कामे पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांनी दिले.