
वेंगुर्ला : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. जास्मिन आणि त्यांच्या समवेत आलेल्या मूल्यमापन समितीने वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायतीला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान समितीने अभियानाच्या निकषांनुसार ग्रामपंचायतीमधील सर्व विभागांचा व विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ग्रामपंचायतीच्या एकूणच कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीमध्ये कोल्हापूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, प्रकल्प संचालक माधुरी परीट, कार्यकारी अधिकारी अर्जुन गोळे, समीर देशपांडे याचा समावेश होता. यांच्यासमवेत वेंगुर्ला पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, कृषी विस्तार अधिकारी प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण मूल्यमापन भेटीप्रसंगी अणसूरचे सरपंच सत्यविजय गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, उपसरपंच वैभवी मालवणकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि कर्मचारी यांनी पारंपारिक पद्धतीने समितीचे स्वागत केले. याप्रसंगी पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, केंद्र चालक, मुख्याध्यापक श्री. मळगावकर, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, सीआरपीएफ (CRP) प्रतिनिधी, महिला बचत गटांच्या सदस्या, 'एमएसआरएलएम' (MSRLM) अभियानाचे अधिकारी व कर्मचारी, गावातील ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मूल्यमापन समितीने केलेल्या कौतुकामुळे अणसूर ग्रामपंचायतीच्या समृद्धी वाटचालीस मोठी ऊर्जा मिळाली आहे.










