LIVE UPDATES

भाजपच्या मोहीनी मडगावकरांसह महिला कार्यकारीणीचे तडकाफडकी राजीनामे

महिला जिल्हाध्यक्षांमागे सूत्रधार वेगळा
Edited by: विनायक गांवस
Published on: June 06, 2026 13:19 PM
views 179  views

  •  श्वेता कोरगावकर त्यांना घाबरतात कशाला ?

सावंतवाडी : 'एक व्यक्ती एक पद’ या न्यायाचा दाखला देत माझ्याकडे नगरसेविका आणि नगरपरिषद सभापती पद असल्याचे सांगून महिला जिल्हाध्यक्षांनी माझ्याकडे कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच महिला शहर मंडल अध्यक्ष पदाचा राजीनामा मागितला. पक्षातील अनेक नेत्यांकडे दोन-दोन पदे असताना केवळ माझ्यावरच हा अन्याय का ? सावंतवाडीत येऊन ढवळाढवळ करणाऱ्या सूत्रधाराच्या इशाऱ्यावर महिला जिल्हाध्यक्षा काम करत आहेत. सूत्रधाराला त्या एवढ्या का घाबरतात ? आज त्या सूत्रधाराच्या सततच्या हस्तक्षेपामुळे आणि छुप्या कारवायांमुळेच मी आणि महिला कार्यकारीणीतील पदाधिकारी सन्मानाने राजीनामा देत आहोत असे मत भाजपच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी व्यक्त केले. तर भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर व भाजप सरचिटणीस महेश सारंग यांच्यावर नाव घेत आरोप केलेत. 

येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शहर उपाध्यक्षा ज्योती मुद्राळे, सचिव नयना सावंत, मीना दाभोलकर, साक्षी गवस, मेघना साळगावकर आदी उपस्थित होत्या. यावेळी आपल्या पदाचे राजीनामे देत असून सदस्य म्हणून पक्षाच काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आपण केवळ पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असून भाजपमध्येच कायम राहणार आहे. पर्यटन सभापती व नगरसेविका म्हणून जनतेची सेवा करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सौ. मडगावकर म्हणाल्या, भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग हे यामागचे सूत्रधार आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर काम करत आहेत. ते जशी चावी फिरवतात तशा त्या बोलतात. महिलांच्या कार्यात आणि शहराच्या राजकारणात या बाहेरच्या माणसाने अन् पुरूषाने ढवळाढवळ करण्याचे कारण काय ? या सूत्रधाराच्या सततच्या लुडबुडीमुळे शहरातील अनेक महिला पक्षात सक्रिय होत नाहीत. ते सातत्याने माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी माझी बदनामी करणे थांबवावे, माझ्याकडेही अनेक गोष्टींची इत्यंभूत माहिती आहे, वेळ पडल्यास मलाही बोलाव लागेल असा इशारा सौ. मडगावकर यांनी दिला. पक्षातील महिला या भगिनीसमान असायला हव्यात, मात्र इथे एकाधिकारशाही चालवली जात आहे. पक्षातील नेते खास. नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे महिलांना आदर देतात. मानसन्मानाने आम्हाला वागवतात‌. मात्र, स्थानिक पदाधिकारी आम्हाला तुच्छ लेखतात. दोन पदांवर मी नको तर जिल्ह्यातीर बरीच मंडळी दोन-दोन ठिकाणी कार्यरत आहेत. सुधीर आडीवरेकर सुद्धा शहराध्यक्ष आहेत अन् सभापती आहेत. मग, दबाव माझ्यावरच का ? पालकमंत्र्यांच नाव सांगून या गोष्टी करत आहेत. मात्र, पालकमंत्री अशा गोष्टीत लक्ष घालणारे नाहीत. ते महिलांना सन्मान देणारे आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून हे कुरघोड्या करत आहेत. या लोकांमुळेच आज पक्षात गटबाजी वाढत चालली आहे. यापूर्वीही संजू परब पक्षात असताना मला पदावरून हटविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पक्षातच असणाऱ्या विशाल परब यांच्या जाहीर  कार्यक्रमात उपस्थित राहील्याने राजीनामा देण्यासाठी दबाव आणला. आता ही तिसरी वेळ असून मी स्वतः स्वाभिमानाने राजीनामा देता आहे. स्वाभिमान पक्षातून भाजपात आले तेव्हा दोन महिला पदाधिकारी पक्षात होत्या. आज शहरात ५० हून अधिक महिला कार्यरत असातान माझ्यावर केवळ अन्याय केला जात आहे. आमच्या नेतृत्वाखाली शहरात ११ नगरसेवांका, नगराध्यक्षा निवडून  आल्या असून यात अनेक महिला नगरसेविका झाल्यात. लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही रक्ताचा पाणी केलं. महिला मोर्चाने दिलेले सर्व कार्यक्रम आम्ही यशस्वी करून दाखवले. एवढे काम करूनही कौतुक करायचे सोडून उलट पद सोडण्याचा दबाव आणला जात आहे. जिल्ह्यात अनेक महिलांकडे, पुरूषांकडे दोन ते तीन पदे असताना, केवळ माझाच राजीनामा का मागितला जातोय ? त्या सूत्रधाराला माझ्या जागी नक्की कोणाला आणायचे आहे ? पक्ष कोणासाठी थांबत नाही, पण हे राजकारण नक्की कोणासाठी चालले आहे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. 


तसेच मला नगरसेविका म्हणून तिकीट देतानाही या मंडळींनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मात्र, मोठ्या मताधिक्याने मी निवडून आले. आज जनतेच काम मी करत आहे. अन् कायम करणार आहे. आमचं प्रेम पक्षावर आहे. आमचे नेते आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षात काम करत राहू‌. मात्र, पदावर कार्यरत राहणार नाही. भाजपचे वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी यांचे मला नेहमीच चांगले सहकार्य लाभले आहे आणि मी भाजपमध्येच कायम राहणार आहे. पद काढून घेण्यापेक्षा मी सन्मानाने बाजूला होणे पसंत केले आहे, असे सांगत त्यांनी आपला राजीनामा सादर केला.