
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र आडेली (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे शुक्रवारी (५ जून) जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती प्रितेश राऊळ यांनी भेट दिली व आढावा घेतला. यावेळी आरोग्य केंद्रातील विविध समस्या जाणून घेत त्यांनी आडेली पीएचसी मुख्य इमारत, शवविच्छेदन गृह, तसेच जीर्ण झालेल्या कर्मचारी निवास इत्यादींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून निर्लेखन प्रक्रियेला गती देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकारी म्हाडेश्वर यांना मोबाईलद्वारे दिल्या. यावेळी आडेली पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, आडेली ग्रामपंचायत सरपंच यशस्वी कोंडसकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र लिलके, आडेली प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी पाटील, डॉ अश्विनी माईंणकर, माजी ग्रा.पं. सदस्य विष्णू कोंडसकर, आरोग्य सहाय्यक शेखर कांबळी, श्री. कुडव, श्री वालावलकर, चेतन अंधारी, संतोष धर्णे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तोरसकर आदी उपस्थित होते.
यावेळी जि. प. सभापती प्रितेश राऊळ यांनी आरोग्य केंद्रातील समस्याबाबत आढावा घेतला. तसेच आरोग्य केंद्रासाठी सीसीटीव्ही सुविधाबाबत चर्चा झाली. तसेच आरोग्य केंद्रातील रिक्तपदाबाबत माहिती घेत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या संबंधिताना सूचना केल्या. तसेच यावेळी श्री राऊळ यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, श्री. शिंदे आदी उपस्थित होते.










