LIVE UPDATES

येत्या १५ दिवसात मान्सूनपूर्वीची सर्व कामे पूर्ण करा

वीज वितरणला पंचायत समिती सभेत सूचना
Edited by: दिपेश परब
Published on: May 22, 2026 19:40 PM
views 29  views

वेंगुर्ला : अजून मुख्य मान्सूनला सुरुवात झाली नसताना वारंवार वीज जाण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे येत्या १५ दिवसात मान्सूनपूर्व कामे, सर्व विद्युत वाहिन्यांची कामे, झाडी कटिंग कामे पूर्ण करा, ठिकठिकाणी घटनास्थळी जाऊन पाहणी करा, नागरिकांचे प्रश्न तात्काळ सुटले पाहिजेत यासाठी काम करा अशा सूचना विद्युत वितरण विभागाला आजच्या पंचायत समिती मासिक सभेत देण्यात आल्या.

वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी (२२ मे) सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली पं स च्या बॅ नाथ पै सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, संकेत धुरी, सुचिता वजराटकर, साक्षी नार्वेकर, प्रियांका घाटवळ, शीतल राऊत, योगिता परब यांच्यासहित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

या सभेत विद्युत वितरण विभागाच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सभापती शंकर घारे यांनी वारंवार विद्युत पुरावठा खंडित होण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर जास्तीत जास्त वीज पुरवठा झाडाच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून खंडित होत होते. तसेच कुडाळ वरून वेंगुर्ले येथे जाणाऱ्या ३३ केव्ही भूमिगत विद्युत वाहिनेचे काम आडेली सबस्टेशन पर्यंत पूर्ण झाले असून पुढील कामाची  प्रक्रिया सुरू असल्याचे अभियंता पटेकर यांनी सांगितले. यावर उपसभापती सचिन देसाई यांनी त्यांना धारेवर धरले. या कामाचा ठेकेदार मनमानी करतो. त्यावर कोण लक्ष ठेवणार ? अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालतात. तुम्ही कार्यतत्परता दाखवली तर असे प्रकार होणार नाहीत. बिल वेळच्या वेळी घेता मात्र सेवा मिळत नाही. असे यावेळी उपसभापती देसाई म्हणाले. 

वन्यप्राण्यांमुळे शेती, बागायतींचे नुकसान होते. याच्या नुकसान भरपाईसाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. सामायिक सातबारा असल्यास शेतकऱ्यांना अडचणी येतात. यामुळे कागदपत्रांमध्ये सुलभता आणावी तसेच गाव्या रेड्यांमुळे अपघात होतात त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना सभापती घारे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावर वनविभागामार्फ़त शेतकऱ्यांचे स्वयंघोषणापत्र करून नुकसान भरपाई साठी कोणताही शेतकरी वाचिंत राहणार नाही याची काळजी घेत असल्याचे सांगितले. तसेच वन्य प्राणी जंगलातच राहावे यासाठी जंगलातच पाणवठे तयार करण्याचे काम सुरू आहे. रस्त्यालगत तारेचे कुंपणही घातला येत. मात्र बहुतांशी रस्त्यालगतच्या जमिनी ह्या खासगी असल्याने त्यांच्या परवानग्या आवश्यक असल्याचे वनविभागाचे मठ वनपाल सावळा कांबळे यांनी सांगितले. 

सार्वजनिक बांधकामाच्या मालकीच्या रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी दगड माती टाकल्या जातात त्यामुळे अपघात होतात अश्यांना नोटिसा द्याव्यात अशी सूचना उपसभापती देसाई यांनी केली. वेंगुर्ला ते शिरोडा सागरी महामार्गावर उभादांडा येथे रस्त्यालगत अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. याची पाहणी करून कारवाई करण्याची सदस्य नार्वेकर यांनी मागणी केली. 

आसोली, सखैलेखोल, सोन्सुरा, आरवली आदी भागात स्थानिक नागरिकांचा मायनिंगला विरोध असताना ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हे केला जातोय तो बंद करण्यात यावा. शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील मृतदेह रेडी येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात येतात त्यासाठी शिरोडा येथेच जागा उपलब्ध करून देण्यात यावी. शिरोडा वेळागर येथे जाणारा रस्ता होण्याबाबत एमटीडीसीला पत्र पाठवून ताज ग्रुप ला सूचना देण्यात याव्यात आदी सूचना सदस्य योगिता परब यांनी मांडल्या. 

या सभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात अणसुर ग्रामपंचायत प्रथम पेंडूर ग्रा प द्वितीय, परुळेबाजार ग्रा प चा तृतीय तर मेढा व पालकरवाडी ग्रा प चा उत्तेजनार्थ क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन याचा ठराव तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन चा ठराव व सिंधूरत्न योजनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी पालकमंत्री नितेश राणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन याचा ठराव घेण्यात आला. 

आयकार्ड न घातलेल्या अधिकाऱ्यांना सुनावले

सभेत अनेक विभागाचे अधिकारी महाराष्ट्र शासनाचे आयकार्ड घालून आले नसल्याने निदर्शनास आल्यानंतर उपसभापती सचिन देसाई यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. नेमका तो अधिकारी आहे का की दुसराच कोण सभेला बसला हे कसे समजणार असा प्रश्न उपस्थित केला. वेंगुर्ला तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मेंटेनन्सच्या कामाची किती निविदा प्रक्रिया झाली. त्यावर मागच्या वर्षी किती पैसे खर्च झाले ? याची पुढील सभेत माहिती देण्याच्या सूचना पं स सदस्य नितीन मांजरेकर यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना केल्या.