LIVE UPDATES

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम नक्की कोणासाठी ?

चांगल्या कार्यक्रमांना का मुकतात प्रेक्षक ? | सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारांनी घ्यावी दखल
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 22, 2026 20:05 PM
views 105  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित तीन दिवशीय ''असंघटित लोककलांचा महोत्सव'' आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांचा तीन अंकी आकडी सुद्धा पार झाला नव्हता. त्यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे हे उत्तम व सांस्कृतिक मेजवानी असणारे कार्यक्रम नक्की कोणासाठी आयोजित केले जातात ? मोफत प्रयोग असूनही प्रेक्षक अशा चांगल्या  कार्यक्रमांना का मुकतात ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

येथील बॅ. नाथ पै सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून २२, २३ व २४ मे या तीन दिवसांकरीता या असंघटित लोककलांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन आज मोठ्या दिमाखात संपन्न झाले. यावेळी नाट्य दिग्दर्शक, अभिनेते गणेश ठाकूर, अभिनेत्री सोनल लेले, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस, प्रा. डॉ. एन डी कार्वेकर, आर्यन देसाई आदी उपस्थित होते. यावेळी श्री. ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. आजच्या डिजीटल युगात प्रेक्षक चांगल्या कार्यक्रमांना येत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. असंघटित लोककलांचा महोत्सव ही श्रोत्यांसाठी मेजवानी असून लुप्त झालेल्या लोककला पाहण्याची ही संधी आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

दरम्यान, साधारण तीन महिन्यांपूर्वी याच सभागृहात सांस्कृतिक संचालनालयाचे निरूपणकार गणेश शिंदे यांचा 'ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला' हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक जीवनचरित्रावर आधारित विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, त्यावेळीही प्रेक्षकांची असणारी उपस्थिती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली. आजही असंघटित लोककलांच्या महोत्सवात असंच चित्र बघायला मिळालं. शुक्रवारी करपल्लवी गोंधळी, बहुरुपी, धनगरी ओवी, हेळवी लोककलावंत, फुगडी आणि झिम्मा आदी लुप्त होत चाललेले कार्यक्रम पार पडत आहेत. तर शनिवारी आदिवासी पाटा गायन, खेळे कळसूत्री बाहुल्यांचा, धिरो धिरो नृत्य, मयूर नृत्य आणि लैंगी बंजारा नृत्य, रविवारी कोकणची लोककला परंपरा समृद्ध करणारे दशावतार नाटक, कोळी नृत्य, सोंगी मुखवटे, दिमडी, ढोलकी, ढोल-ताशा वाद्यवृंद जुगलबंदी आणि भारुड यांसारख्या प्रसिद्ध कलाप्रकारांसह लोककलांचे सादरीकरण प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे. मात्र, मोफत असणाऱ्या या कार्यक्रमांना प्रेक्षक का उपस्थित राहत नाही ? हा मोठा प्रश्न आहे. सावंतवाडी ही नाट्य, कला-संस्कृतीची भूमी असून येथे मोठा प्रेक्षकवर्गही आहे. सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक संस्था इथे कार्यरत आहेत. मात्र, या कार्यक्रमांना असणारी अनुपस्थिती बघता नियोजनात आयोजक, संयोजक कमी पडतात ? की सांस्कृतिक कार्य विभाग केवळ कार्यक्रम संपन्न करण्यापूर्तीच मर्यादित राहत ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित राहत आहे.