
कणकवली : शहरानजीक हळवल फाटा येथे धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना सायंकाळी 7:30 च्या सुमारास घडलीआहे. या घटनेत दुचाकी चालक सुदैवाने बचावला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वागदे येथील एका व्यावसायिकाची ही दुचाकी असून जाणवली येथे सर्विसिंग करून ती दुचाकी तो घरी नेत होता अचानक दुचाकीतून सर सर असा आवाज यायला सुरुवात झाली. काही क्षणातच दुचाकीला भीषण आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ दुचाकी बाजूला थांबवून स्वतःचा जीव वाचवला.
घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आगच एवढी मोठी धरली की भिजवण्याचे प्रयत्न असफल ठरले या आगीत दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट अथवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित दुचाकी अवघ्या दोन वर्षांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती.











