
वैभववाडी : कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालयानजीक दुचाकीवरून पडून अरुळे येथील महिला गंभीर जखमी झाली. ममता रमन राऊत (वय ४५, रा. अरुळे) असे जखमी महिलेचे नाव आहे.हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. राऊत या दुचाकीच्या मागील सीटवर बसून वैभववाडीच्या दिशेने येत होत्या. कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालयाजवळील गतीरोधकावर चालकाने दुचाकीचा ब्रेक लावला.यावेळी मागील बाजूस बसलेल्या सौ.राऊत या रस्त्यावर कोसळल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या अपघाताची नोंद उशिरापर्यंत वैभववाडी पोलीस स्थानकात झालेली नव्हती.











