
वेंगुर्ला: मठ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मध्ये काही ठिकाणी सध्या मे अखेर असल्यामुळे पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. येथील नागरिकांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून ते दैनंदिन वापरास लागणाऱ्या पाण्यासाठी खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ही बाब मठ ग्रामपंचायत सदस्य दर्शना दिनेश नाईक यांच्या निदर्शनास येताच ज्या कुटुंबांना पाण्याची कमतरता असेल अशा कुटुंबांना मोफत ५०० लिटर पाणी घरपोच सेवा देण्यात येत आहे.
पावसाचे दिवस सुरू होऊन जो पर्यंत पिण्यायोग्य पाण्याची सोय होत नाही तो पर्यंत ही सेवा सुरू ठेवण्यात येईल असे सौ नाईक यांनी सांगितले आहे. त्यामुळे तेथील जनतेत आपण योग्य उमेदवार निवडून दिल्यामुळे एक वेगळच समाधान व्यक्त होत आहेत. तसेच रोज नाईक यांच्या मार्फत तीन ते चार कुटुंबाना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्य दर्शना नाईक यांचा मुलगा समीर नाईक याला सामाजिक कार्याची आवड असल्याकारणाने आपला हॉटेल व्यवसाय सांभाळून दुपारी मधल्या वेळात ही सेवा तो घरपोच देत आहे. या त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.











