मच्छीमारांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी

वैभव नाईक आक्रमक
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 17, 2026 19:06 PM
views 49  views

कुडाळ : मालवण किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यावसायिकांना प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांवरून सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. "माझ्या १० वर्षांच्या आमदारकीच्या काळात कधीही अशा नोटिसा आल्या नाहीत, मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या नोटिसा कशा काय आल्या?" असा थेट सवाल उपस्थित करत, माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधारी आमदार निलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

वैभव नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे की, जर गोरगरीब मच्छीमारांच्या घरांना किंवा छोट्या हॉटेल व्यावसायिकांच्या बांधकामांना हात लावला, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष गप्प बसणार नाही. "सत्ताधारी लोकप्रतिनिधींना विचारल्याशिवाय अधिकारी नोटिसा काढण्याची हिम्मत कशी करतात? यामागे केवळ राजकारण असून निलेश राणे प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन मच्छीमारांची फसवणूक करत आहेत," असा आरोप नाईक यांनी केला. मालवणलाच लक्ष्य का? देवगड किंवा वेंगुर्लेमध्ये अशा नोटिसा आल्या नाहीत, मग केवळ मालवणमध्येच हा प्रकार का घडत आहे?

सत्ताधाऱ्यांचे अपयश: निलेश राणे सत्ताधारी आमदार असताना अधिकारी त्यांच्या संमतीशिवाय पाऊल उचलूच शकत नाहीत. मग ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक कशासाठी? खोट्या घोषणा: निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी बांधवांना मोफत जागा देण्याची घोषणा केली होती, त्या घोषणेचे काय झाले? ती केवळ निवडणुकीपुरतीच होती का?

"सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय धनदांडग्यांनी अनेक अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. हिंमत असेल तर महसूल विभागाने आधी त्यांच्यावर कारवाई करावी. स्थानिकांनी या नोटिसांना भीक घालू नये, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं वैभव नाईक यांनी सांगितलं. मालवणमधील स्थानिक मच्छीमार आपल्या पारंपरिक व्यवसायासोबतच पर्यटनावर आधारित छोटा हॉटेल व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. अशा वेळी त्यांना नोटिसा देऊन भयभीत केले जात असल्याचा दावा नाईक यांनी केला आहे. "स्थानिक जनतेच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरू," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.