LIVE UPDATES

शिरोड्याच्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाला विद्यार्थ्यांची मानवंदना

२०३० पूर्वी स्मारक उभारण्याची मागणी
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 04, 2026 19:51 PM
views 38  views

वेंगुर्ला : २ ऑक्टोबर रोजी गांधीजयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील शिरोडा येथील ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाच्या स्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मानवंदना कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सत्याग्रहाच्या काळात देशासाठी आहुती देणाऱ्या स्थानिक सत्याग्रहींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब यांनी उपस्थितांचे आभार मानले. मिठाच्या सत्याग्रहात योगदान देणाऱ्या ३५० हून अधिक स्थानिक सत्याग्रहींना विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. या माध्यमातून नव्या पिढीला शिरोड्याच्या ऐतिहासिक लढ्याची माहिती मिळावी, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रहाला सन २०३० मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

मात्र, या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या स्मृती जपणारे भव्य स्मारक किंवा इतिहासाच्या ठोस खुणा अद्याप या ठिकाणी अस्तित्वात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे इतिहासप्रेमी आणि राष्ट्राभिमानी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने २०३० पूर्वी शिरोड्यात ऐतिहासिक स्मारक उभारण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी तसेच स्मारकाची इच्छा लवकर पूर्ण व्हावी, यासाठी सायंकाळी आयोजित सत्यनारायण पूजेत प्रार्थना करण्यात आली.