
देवगड : शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा २०२६ मध्ये शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘श्वास’ या विज्ञान नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला. शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
विज्ञान आणि समाजजीवन यांचा प्रभावी मेळ साधत विद्यार्थ्यांनी ‘श्वास’ या विज्ञान नाटिकेचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या प्रभावी अभिनयासोबतच आशयपूर्ण मांडणी, संवादफेक, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत यामुळे नाटिकेला विशेष दाद मिळाली. परीक्षकांनी केलेल्या परीक्षणात देवगडच्या शेठ म. ग. हायस्कूलच्या ‘श्वास’ नाटिकेने प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
या विज्ञान नाटिकेत सम्यक महेश सकपाळ, हर्ष ध्वजेंद्र मिराशी, मयंक योगेश धुरी, प्रणव चेतन ठाकूर, कस्तुरी दीपक कांबळी, गार्गी अतुल वाडकर, शुभ्रा हितेश कुबल आणि अनन्या गणेश जोशी यांनी सहभाग घेतला. यामध्ये कु. अनन्या गणेश जोशी हिने आपल्या प्रभावी अभिनयाची छाप पाडत सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयाचे पारितोषिक मिळविले.
नाटिकेला संगीताची साथ गौरव तुकाराम जोशी आणि मंथन विनोद मेस्त्री यांनी दिली. नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन सौ. आज्ञा अभिषेक कोयंडे यांनी केले. नेपथ्य व प्रकाशयोजना श्री. अभिषेक नरहरी कोयंडे यांनी सांभाळली, तर संगीत आकाश सकपाळ यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका सौ. दहिबावकर मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शकांचे व संपूर्ण चमूचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










