
वेंगुर्ला : विज्ञान नाट्योत्सवासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सुंदर समन्वय साधता येतो. विद्यार्थ्यांनी विज्ञानातून नवनिर्मितीचा ध्यास घेत नवनवीन प्रयोग, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले.
वेंगुर्ला येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाला आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विज्ञान नाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास विकसित होत असल्याचे सांगितले. आमदार राणे म्हणाले की, आजची मुले ही उद्याच्या समाजाची दिशा ठरवणारी पिढी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञानावर अवलंबून न राहता प्रयोगशील बनले पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजासमोरील विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. नवीन संकल्पना, संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यांना प्रोत्साहन मिळणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
विज्ञान नाट्योत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळते. वैज्ञानिक विषय नाट्याच्या माध्यमातून सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम विद्यार्थी करीत आहेत. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मार्गदर्शकांचे आमदार राणे यांनी कौतुक केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, पाल सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, मच्छिमार नेते वसंत तांडेल, तुषार साळगावकर यांच्यासहित शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. विज्ञान नाट्योत्सवात सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.










