LIVE UPDATES

समाजभूषण पुरस्काराने डॉ. दिनेश नागवेकर, प्रमोद काळसेकर यांचा सन्मान

रामदास नाईक, रसिका आईर यांना 'श्रावणबाळ' पुरस्कार | ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 04, 2026 13:45 PM
views 12  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समाजात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. समाजभूषण पुरस्कारांने प्रा. डॉ. दिनेश नागवेकर व पोलीस अधिकारी प्रमोद काळसेकर यांचा सन्मान करण्यात आला. तर श्रावणबाळ पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते रामदास नाईक, रसिका आईर यांनी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वार्षिक मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते विविध सत्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर म्हणाले, शिक्षणमंत्री असताना सावंतवाडीतील ज्येष्ठ नागरिकांच्या सुचनेनुसार राज्यभरातील शाळांमध्ये 'आजी- आजोबा' दिवस साजरा करण्यास प्रारंभ करता आला. मी देखील आता ज्येष्ठांच्या यादीत आलो असून तुमच्या आशिर्वादामुळेच आजही कार्यरत आहे. सावंतवाडीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या इमारतीसाठी आमदार निधीतून लिफ्ट सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली‌. 

दरम्यान, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी ७० वर्षांवरील नागरिकांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी वाढलेले सायबर गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठांनी फसू नये यासाठी मार्गदर्शन केले. कोणत्याही फसवणूकीला बळी न पडता पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. यानंतर मान्यवरांचे हस्ते विविध सत्कार करण्यात आले. यामध्ये श्रावणबाळ पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते रामदास नाईक, रसिका आईर, समाजभूषण पुरस्काराने डॉ. दिनेश नागवेकर, प्रमोद काळसेकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच बाळकृष्ण राणे, स्वप्ना गोवेकर आदींसह ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, प्रा. ॲड.  अरूण पणदुरकर, सैनिक बँक बाबुराव कविटकर, ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडीचे अध्यक्ष दिगंबर पावसकर, सल्लागार अण्णा देसाई, राजेंद्र बिर्जे, प्रकाश राऊळ, शाम निवेलकर, विदुल पाटणकर, सी.एल.नाईक आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले.