
वैभववाडी : ट्रॅक्टरचा पुढील टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात करूळ-भोयडेवाडी येथील रुपेश हनुमंत पाटील (वय ४०) यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास एडगाव-आंबेवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. रुपेश यांच्या आकस्मिक निधनाने करूळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रुपेश पाटील हे त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर (एमएच ०७ एएस ७८१२) घेऊन वैभववाडीहून करूळच्या दिशेने जात होते. एडगाव-आंबेवाडी परिसरात राष्ट्रीय महामार्गावरून ट्रॅक्टर जात असताना अचानक पुढील टायर फुटला. त्यामुळे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या उजव्या बाजूच्या गटारात जाऊन आदळला. या अपघातात रुपेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने खासगी वाहनातून रुपेश यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर करूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.रुपेश यांच्या आकस्मिक निधनाने करूळ-भोयडेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजय, पुतणे आणि बहिणी असा परिवार आहे. अपघाताचा अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.










