LIVE UPDATES

वेंगुर्ला-बोरीवली एसटीची फेरी ७ सप्टेंबर पासून पूर्ववत : सचिन देसाई

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आमदार केसरकरांनी वेधले होते लक्ष
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 18:48 PM
views 30  views

वेंगुर्ला : तालुक्यातून वेंगुर्ला-बोरीवली मार्गावर सुरू असलेली एसटी बसफेरी गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही बसफेरी पूर्ववत करावी, अशी मागणी आमदार केसरकर यांनी केली होती. यानुसार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ७ सप्टेंबर २०२६ पासून ही बसफेरी सुरू होणार असल्याची माहिती वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई यांनी दिली आहे. 

वेंगुर्ला एसटी आगारातून एसटी महामंडळाकडून वेंगुर्ला-बोरीवली एसटी बससेवा अनेक वर्षे सुरू होती. या बसफेरीला मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत होता. मुंबईतील बोरीवली तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांना या बससेवेचा मोठा फायदा होत होता.

तसेच वेंगुर्ला-बोरीवली या मार्गावर कुडाळ, कणकवली, खेड व रायगड जिल्ह्यातील अनेक महत्त्वाची गावे येत असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही बस अत्यंत सोयीची होती. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून सदर बससेवा एसटी महामंडळाकडून बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली होती. 

यानुसार वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, तालुकाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांनी आमदार दीपक केसरकर यांचे याकडे लक्ष वेधले होते. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या वेंगुर्ला तालुक्याच्या आमसभेत नागरिकांनी ही बससेवा नियमित सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती.

यानुसार बंद करण्यात आलेली वेंगुर्ला-बोरीवली व परतीची एसटी बसफेरी पुन्हा पूर्ववत सुरू करावी यासाठी परिवहन विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार केसरकर यांनी परिवहन मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तसेच एसटी संदर्भातील प्रश्नांच्या बैठकीवेळी केली होती. यानुसार ही बस फेरी सुरू झाल्याने शिवसेनेच्यावतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व आमदार दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.