LIVE UPDATES

मैदानावर घाम गाळणारा विद्यार्थीच आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरा जाऊ शकतो

प्रितेश राऊळ यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 19:40 PM
views 25  views

वेंगुर्ले : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच खेळालाही तितकेच महत्त्व आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते तसेच शिस्त, संयम, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना देखील विकसित होते. आजच्या काळात मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियामुळे मुलांचा मैदानी खेळाकडे कल कमी होताना दिसतो. त्यामुळे अशा क्रीडा स्पर्धांचे महत्त्व आणखी वाढले आहे. मैदानावर घाम गाळणारा विद्यार्थीच आयुष्यातील अनेक आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरा जाऊ शकतो असे मार्गदर्शन जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी वेंगुर्ले येथे केले. 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, जागृती क्रीडा मंडळाचे दिलीप मालवणकर, तुषार साळगावकर, संजीवनी परब, संजय परब, पंच हेमंत गावडे, वासुदेव गावडे, बबलू कुबल, जयराम चुडनाईक आदी उपस्थित होते.