
वेंगुर्ला : तालुक्यातील वीज वितरण विभाग, पाणी पुरवठा, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन विकास महामंडळ, परिवहन मंडळ आदी विभागांच्या विविध प्रश्नांवर त्या भागात स्वतंत्र बैठक लावून विषय मार्गी लावण्यात येतील. तसेच विविध प्रलंबित विकासकामांसाठी आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे अश्वासन आज वेंगुर्लेत झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत आमदार दीपक केसरकर यांनी दिले. तर मुख्यमंत्री ग्रामसडकच्या दीड वर्षे प्रलंबित अडलेल्या कामांबाबत आमदार केसरकरांच्या आक्रमक पवित्रा घेत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
वेंगुर्ला नगरपरिषदच्या कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात आमदार दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला पंचायत समितीची आमसभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शंकर कांबळी, सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी जि. प. सभापती विष्णुदास उर्फ दादा कुबल, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जि. प. सुजाता पडवळ, संजय गावडे, विजय नाईक, यज्ञा साळगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, माजी सभापती सुनील मोरजकर, पं स सदस्य नितीन मांजरेकर, विष्णू फणसेकर, संकेत धुरी, सुचिता वजराटकर, साक्षी नार्वेकर, प्रियांका घाटवळ, नगरसेवक प्रणव वायंगणकर, गौरी मराठे, प्रीतम सावंत, सुषमा प्रभूखानोलकर, आकांक्षा परब, रिया केरकर, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, गौरी माईणकर आदी उपस्थित होते.
यावेळी पं. स. गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून आमसभेत सुरुवात झाली. सर्वप्रथम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आशा भोसले, माजी जि. प. अध्यक्ष सरोज परब, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सर्वंप्रथम शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, पालकमंत्री यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी यांच्या अभिनंदनाचे ठराव मांडले. तसेच कोकण विभागाचा आदर्श पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच तालुक्यातील दहावी व बारावी तील प्रथम तीन क्रमांकप्राप्त विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, कृषी अधिकारी प्रकाश मोहिते यांच्या अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले. या सभेत सभापती शंकर घारे यांच्या हस्ते आ. दिपक केसरकर व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ला तालुका ग्रामीण भाग जनतेच्या हिताच्या दृष्टीने जास्तीत जास्त मिनीबसेस देण्यात यावेत, अशी मागणी उपसभापती सचिन देसाई यांनी आमसभेत केली. यावेळी वेंगुर्ला साठी १५ मिनीबसची मागणीचे पत्र देऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी ३० बसेस दिल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव आ. केसरकर यांनी मांडला. तालुक्यातील एसटीच्या विविध प्रश्नांवर कमलेश गावडे यांनी प्रकाशझोत टाकत कार्यवाहीची मागणी केली.
शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्पाबाबत नुकताच राज्यस्तरावर महत्त्वपूर्ण करार झाला आहे. याबाबत वेळागर संघर्ष समितीचे नेते तथा माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. ताज प्रकल्पाबाबत तोंडी आश्वासन न देता लेखी आश्वासन दिल्यास सर्वे नंबर 39 व वेळागरचा पूर्ण पाठिंबा ताज प्रकल्पासाठी राहील, असे जयप्रकाश चमणकर यांनी बोलताना स्पष्ट केले.
तर स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय ताजचे काम सुरू होणार नाही असे आश्वासन आम. केसरकर यांनी दिले. यावेळी आंबा काजू कर्जमाफी रक्कम वेळीच मिळावी अशी मागणी चमणकर यांनी केली. याबाबत ही रक्कम श्री गणेश चतुर्थी पूर्वी मिळावी असा ठराव घेण्यात आला व मुख्यमंत्री यांना पत्र देण्याचे आ. केसरकर यांनी सुचित केले.
उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुद्धा सुविधा नाहीत यावर तातडीने लक्ष द्यावा तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे पगार गणेशोत्सवापूर्वी द्यावे व कंत्राटी कामगारांकडून लाज घेणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी इर्शाद शेख यांनी केली.
यावेळी खासदार नारायण राणेंच्या माध्यमातून एसएसपीएम हॉस्पिटल मधून प्रत्येक दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर देण्यात आल्याचे आमदार केसरकर यांनी सांगितले. पर्यटनाच्या दृष्टीने निवती किल्ल्याचा विकास करा करण्याची मागणी रुपेश मुंडये यांनी केली. यावर निवती, भोगवे पर्यटक सुचनांबाबत कार्यवाहीचे एमटीडीसीला आमदार केसरकरांचे आदेश दिले.
तालुक्यातील १८७ पासून २११ नंबर पर्यंत २४ ग्रामीण रस्त्यांची नोंदच नसल्याने या रस्त्यांचे नूतनीकरण रखडले असल्याबाबत सूचना पेंडुर सरपंच संतोष गावडे यांनी केली. यावर रस्त्यांबाबत आमदार केसरकरांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. रेडी गावात आम्ही मायनींग स्वीकारले असून खनिकर्मचा निधी रेडी गावाला मिळत नसल्याची खंत सरपंच रामसिंग राणे यांनी व्यक्त केली.
यावर खनिकर्मचा जास्तीत जास्त निधी रेडीला देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा आमदार केसरकर यांनी आमसभेत शब्द दिला. तसेच यावेळी कवितांचे गाव प्रकल्प, सागरेश्वर वरील एमटीडीसी प्रकल्प बाबत चौकशी करण्याची सूचना हितेश धुरी यांनी तर बेकायदेशीर जमीन खरेदीची चौकशी करण्याची सूचना भूषण आंगचेकर यांनी मांडली.
पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या सहित गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, सर्व अधिकारी व कर्मचारी, सचिन वालावलकर, योगेश तेली, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, सर्व पं स सदस्य यांनी सुयोग्य नियोजन केल्यामुळे ही आमसभा शांततेत व नियोजनबद्द संपन्न झाली. याबाबत नागरिकांच्यावतीने समाधान व्यक्त करण्यात आले.










