
वेंगुर्ला : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, विविध वैद्यकीय तपासण्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ‘सिंधू जनआरोग्य यात्रा’ ही केवळ आरोग्यसेवेपुरती मर्यादित न राहता जनचळवळ व्हावी, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. या सिंधू संवाद आरोग्य यात्रेत ५५४ नागरिकांची तर २७७ शालेय मुलांची तपासणी करण्यात आली.
माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रेचा वेंगुर्ला तालुक्यातील शुभारंभ रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला.
या जन संवाद आरोग्य यात्रेला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी भेट दिली. यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पं स उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी, वेंगुर्ला पं स गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, तालुका आरोग्य अधिकारी रविंद्र लीलखे, भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, प्रियांका घाटवळ, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, आरवली सरपंच समीर कांबळी, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, रेडी उपसरपंच आनंद भिसे, सदस्य नमिता नागोळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, शिरोडा ग्रा प सदस्य मयुरेश शिरोडकर, पांडुरंग नाईक, माजी सरपंच मनोज उगवेकर, ऑटो रिक्षा चालक मालक संघाचे अध्यक्ष बाबल गावडे, डॉ साळगावकर, कमलेश गावडे, जनारोग्य समिती सदस्य राहुल गावडे,अमित गावडे, लक्ष्मीकांत कर्पे, कौशिक परब, मयूर आरोलकर, भूषण आंगचेकर, हितेश धुरी, तुषार साळगावकर, सागर राणे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मनीष दळवी म्हणाले की, एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला योग्य पद मिळाल्यानंतर तो त्या पदाला कशा प्रकारे न्याय देऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही जनआरोग्य यात्रा असल्याचे त्यांनी नमूद केले. रेडी कनयाळ येथील आरोग्य उपकेंद्राला पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून ६५ लाखांचा निधी मंजूर असून ते लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे उभारण्यात आले. लोकसहभागातून एखादा उपक्रम जनचळवळ बनला, तर त्याला मोठे यश मिळू शकते, हे या उपक्रमाने सिद्ध केले आहे. त्याच धर्तीवर आरोग्यसेवेची चळवळही लोकचळवळ बनविण्याची गरज आहे. आरोग्यविषयक जनजागृती, स्वच्छतेच्या सवयी, योग्य आहार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी याबाबतही समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी आपल्या भाषणात आरोग्य यात्रेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी करणे आणि आवश्यकतेनुसार त्यांना उच्चस्तरीय उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून आशा स्वयंसेविका, आरोग्यसेवक, डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना आरोग्याचे महत्त्व पटवून देत आहेत.
या शिबिरात अस्थिरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतचिकित्सक यांच्यासह विविध तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. प्रयोगशाळेतील तपासण्या, एक्स-रे आणि अन्य आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. आदरणीय सुरेश प्रभू यांच्या मानव संसाधन विकास संस्थेच्या माध्यमातून मोबाईल ब्लड टेस्टिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. आरोग्य विभागाचे मोबाईल मेडिकल युनिटही या उपक्रमात सहभागी झाले आहे.
भविष्यात कोल्हापूर येथील कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातूनही गावागावांत कर्करोग तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे राऊळ यांनी सांगितले. रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला असून, येथे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुष वेलनेस क्लिनिक सुरू करण्यासाठीही प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती राऊळ यांनी दिली.
पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी सिंधू जनआरोग्य यात्रेचे स्वागत केले. आरोग्याच्या अनेक समस्या सामान्य नागरिकांना भेडसावत असतात; मात्र उपचारांसाठी नेमके कुठे जावे, कोणत्या योजनेचा लाभ घ्यावा, याबाबत अनेकदा संभ्रम असतो.
अशा परिस्थितीत जनआरोग्य यात्रेमुळे नागरिकांना योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. पं. स. उपसभापती सचिन देसाई यांनी आपल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा आरोग्यसेवेचा उपक्रम महाराष्ट्रभर राबविला जाणार असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. सभापती प्रितेश राऊळ यांची सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते, नागरिकांना आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, यापूर्वी अनेक धोरणांची आखणी वरच्या स्तरावरून गावपातळीपर्यंत होत असे. मात्र, जनआरोग्य यात्रेची संकल्पना गावपातळीपासून सुरू होत असल्याने स्थानिक गरजा ओळखून नागरिकांना आरोग्यसेवा देण्यास मदत होणार आहे. प्रत्येक कुटुंबातील नागरिकांचे तन आणि मन निरोगी राहणे महत्त्वाचे आहे.
या यात्रेच्या माध्यमातून गावागावांत आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. ज्या रुग्णांना उच्चस्तरीय उपचारांची आवश्यकता असेल, त्यांना ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येईल. पात्र रुग्णांना योजनेच्या नियमांनुसार आवश्यक शस्त्रक्रियांचा लाभ मोफत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी रेडी येथे बहुविशेषज्ञ आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. जीएमसी सिंधुदुर्ग आणि एसएसपीएमच्या तज्ज्ञ डॉक्टरांसह रुग्णांना तपासणी, प्रयोगशाळा चाचण्या व एक्स-रे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावर दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत अशी शिबिरे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड आणि वय वंदना कार्डच्या लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप करण्यात आले. तसेच अवयवदान करणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला. या यात्रेत ५५४ नागरिकांची, २७७ शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ७० जणांचे एक्स रे काढण्यात आले. ३७ जणांची रक्त तापसणी, १५२ लोकांची एचबी तपासणी, ५५ नागरिकांचा ब्लड ग्रुप तपासणी करण्यात आली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








