LIVE UPDATES

Sawantwadi Railway Station : रेल्वे स्थानकावरील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

अतिरिक्त फलाट आणि लूपलाईनची गरज अधोरेखित
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 04:40 PM
views 16  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आज एक मालगाडी आणि तीन प्रवासी गाड्या एकाचवेळी दिसून आल्याने रेल्वे स्थानकातील उपलब्ध सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोकण रेल्वेचे वेळापत्रक सध्या विस्कळीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त फलाट आणि लूपलाईनची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या शेजारी अतिरिक्त फलाट आणि लूपलाईन उभारण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या जागेचा योग्य वापर करून आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी तातडीने करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्यावतीने करण्यात आली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे गाड्यांचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी अतिरिक्त फलाट आणि लूपलाईन महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

मात्र, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

तसेच स्थानक परिसरातील उपलब्ध जागेचा नियोजनबद्ध वापर करून अतिरिक्त फलाट आणि लूपलाईनच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. रेल्वे वाहतुकीचे योग्य नियोजन, गाड्यांची वेळेत ये-जा आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न आता तरी गांभीर्याने सोडवावा, अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.