LIVE UPDATES

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा

२०,२१,२२ नोव्हेंबरला त्रिसूत्री संगीत महोत्सव ; पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांच्यासह आघाडीच्या कलाकारांची उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 04, 2026 19:32 PM
views 37  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशात संस्थेचे विशेष असे स्थान आहे. गेली ४९ वर्षे संस्था ललित कलांचे संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षणाद्वारे सांस्कृतिक चळवळ चालवित आहे. संगीत क्षेत्रातील त्रिसूत्री उपक्रम गेली २६ वर्षे आयोजित केला जात आहे. यावर्षी त्याचे २७ वे वर्ष असून या वर्षीचा त्रिसूत्री संगीत महोत्सव शुक्रवार दि. २० नोव्हेंबर, शनिवार दि.२१ नोव्हेंबर, रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीही या त्रिसूत्री उपक्रमातील पं. जितेंद्र अभिषेकी त्रिसूत्री संगीत महोत्सव तिन्ही दिवस साजरा होणार आहे.

यावर्षी वामनदाजी शास्त्रोक्त संगीत स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी सहभागाची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२६ असून या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छित असलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीकरिता संस्थेच्या सहकार्यवाह  सिमा कोरगावकर यांच्याशी संपर्क साधावा. ही स्पर्धा राज्य व राज्याबाहेरील स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा अशी संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

या त्रिसूत्री संगीत महोत्सवातील वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धेची अंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवारी दि.२० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवाच्या सुरुवातीला ७:०० वाजता वामनदाजी शास्त्रोक्त संगीत स्पर्धेचा विजेता याचे गायन होऊन तद्नंतर संस्थेच्या सघनगान केद्रांची विद्यार्थीनी ऋचा पिळणकर हिचे गायन झालेनंतर सुप्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर (पुणे) यांचे एकल संवादिनी वादनाने या दिवसाची सांगता होणार आहे.

शनिवार दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक ९:३० वाजता सदर त्रिसूत्री उपक्रमातील रसग्रहण कार्यशाळेने होणार असून सदरची कार्यशाळा सुप्रसिद्ध गायिका आरती कुंडलकर (पुणे) या घेणार असून सदर कार्यशाळेत गायिका पंडिता प्रभा अत्रे यांच्या बंदीशी या विषयावर अभ्यास व मार्गदर्शन करणार आहेत. 

ही कार्यशाळा शनिवारी दोन सत्रात व रविवारी दुपारी १:०० वाजेपर्यंत अशा तीन सत्रात होणार आहे. या कार्यशाळेचे प्रवेश शुल्क रु.१०००/- (रुपये एक हजार मात्र) एवढे आहे. या रसग्रहण कार्यशाळा व संगीत महोत्सव प्रवेशिकासाठी इच्छूक प्रशिक्षणार्थी व संगीत प्रेमी रसिकांसाठी सुवर्णसंधी आहे. 

याच दिवशी संध्याकाळी संस्थेच्या तबला प्रशिक्षण केद्रांचे विद्यार्थी अभिनव जोशी यांचे एकल तबला वादन होऊन तद्नंतर ज्येष्ठ गायिका पद्मश्री पंडिता अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनाने सदर दिवसाची सांगता होणार आहे. रविवार दि.२२ नोव्हेंबर सायंकाळी ७:०० वाजता सदर संगीत महोत्सवाच्या तिस-या दिवसाच्या मैफिलीचा प्रारंभ पं. जितेंद्र अभिषेकी बुवांच्या नाट्यपदांचे गायन संगीत रस सुरस कार्यक्रमाने होऊन तद्नंतर सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना वरदा बेडेकर (गोवा) यांचे कथक नृत्य होणार असून तद्नंतर सदर महोत्सवाची सांगता आरती कुंडलकर (पुणे) यांच्या गायन मैफिलीने होणार आहे. 

या महोत्सवात संवादिनी साथ सुयोग कुंडलकर (पुणे), मंगेश मेस्त्री (सावंतवाडी) व संदिप पेढुंरकर (कणकवली), पल्लवी पिळणकर (सावंतवाडी) व तबला साथ चारुदत्त फडके (पुणे), प्रणव गुरव (पुणे), अभिनव जोशी (देवगड), अथर्व पिळणकर (सावंतवाडी) यांची साथ संगत लाभणार आहे. या त्रिसूत्री उपक्रमा अंतर्गत स्पर्धा कार्यशाळा व संगीत मैफिल नोंदणी माहिती व प्रवेशिकासाठी संस्थेच्या सहकार्यवाह श्रीम. सीमा कोरगावकर (भ्रमणध्वनी क्र. ९४२२३८१९७५) यांच्याशी संपर्क साधावा. तरी या महोत्सवात रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.