LIVE UPDATES

रत्ननगरीत प्रथमच ‘वरदाम्’ युवती संमेलन उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 11:21 AM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरी व रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत प्रथमच ‘वरदाम्’ युवती संमेलनाचे आयोजन करण्यात आले. युवतींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव जागृत करणे आणि विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश होता. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या संमेलनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

संमेलनाची सुरुवात ‘पंचतुंड नररुंड’ या नांदीने झाली. या कार्यक्रमाला रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पा पटवर्धन आणि राष्ट्र सेविका समितीच्या सह कार्यवाहिका श्रीमती उमाताई दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्रीमती उमाताई दांडेकर यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर विचार मांडताना कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “कुटुंब चांगले असेल, तर समाज उत्तम घडतो.” सुसंस्कारित कुटुंबव्यवस्थेतूनच सुदृढ समाजाची निर्मिती होते, असे त्यांनी प्रतिपादन केले.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित परिसंवादात रत्नागिरीतील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर कश्ती शेख, ‘प्राचीन कोकण’च्या संचालिका सौ. स्वरूपा सरदेसाई आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिल्हा संयोजक तथा छात्रनेत्या श्रावणी महाजन सहभागी झाल्या. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या श्रीमती कल्पना आठल्ये यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

या परिसंवादात कश्ती शेख यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव कथन करताना एका छोट्या निर्णयामुळे आयुष्याला कशी नवी दिशा मिळाली, याविषयी प्रेरणादायी विचार मांडले. योग्य वेळी घेतलेला छोटासा निर्णयही व्यक्तीच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो, हा संदेश त्यांच्या अनुभवातून उपस्थित युवतींना मिळाला.

सौ. स्वरूपा सरदेसाई यांनी महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढाकार घेऊन स्वतःच्या क्षमतांचा विकास करावा आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केले. तर श्रावणी महाजन यांनी आपल्या SEIL उपक्रमातील सहभागाचा तसेच संसद भवन भेटीचा अनुभव सांगितला. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःपुरता विचार न करता देशाच्या हिताला प्राधान्य देणारी व्यापक दृष्टी विकसित केली पाहिजे. “भारताचा विद्यार्थी हा केवळ स्वतःचा नव्हे, तर संपूर्ण भारताचा विचार करणारा असला पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

सांस्कृतिक सादरीकरणाने संमेलनाची सांगता

संमेलनाच्या समारोपप्रसंगी नटराज कथ्थक क्लासेसच्या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘स्वतंत्रते भगवती’सह विविध गीतांवर नृत्याविष्कार सादर केला. या सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृती, देशभक्ती आणि कलाविष्कार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.कार्यक्रमाच्या समारोपावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत उपाध्यक्ष प्रा. शिवराज कांबळे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि शहरमंत्री ज्ञानेश्वर चंदनकर उपस्थित होते.

युवतींनी आत्मविश्वासाने पुढे यावे, स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घ्यावी, सामाजिक बांधिलकी जपावी आणि राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय योगदान द्यावे, असा प्रेरणादायी संदेश देणारे ‘वरदाम्’ युवती संमेलन रत्नागिरीत उत्साहात संपन्न झाले.