
दोडामार्ग : दोडामार्गात वन्यप्राण्यांकडून शेती व फळबागांचे होणारे नुकसान, नुकसानभरपाई देण्यास होणारी दिरंगाई, पंचनाम्यांतील फेरफार आणि वनविभागाच्या विविध योजनांमधील गैरव्यवहारांविरोधात बांबर्डे येथील दौलत राणे, मदन राणे आणि सिद्धेश राणे यांनी बुधवारी सकाळपासून दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाला महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षांतील नेत्यांनी पाठिंबा दर्शविला.
दोडामार्ग तालुक्यात वन्य हत्ती, रानडुक्कर, गवे, माकडे, साळिंदर आदी वन्यप्राण्यांकडून भातशेतीसह काजू, नारळ, सुपारी, केळी आणि अन्य फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वारंवार नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पुरेशी आणि वेळेत नुकसानभरपाई मिळत नसल्याची तक्रार आहे. नुकसान झाल्यानंतर पंचनामे करण्यास विलंब होणे, तसेच पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय फेरफार केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा
शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जि.प. माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, दोडामार्ग नगरसेवक चंदन गावकर, काॅंग्रेस जिल्हा सरचिटणीस सुभाष दळवी, ठाकरे शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) उपजिल्हाप्रमुख संदीप गवस, स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, काँग्रेसचे पदाधिकारी बाळा धाऊसकर आणि तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला.
केळी नुकसानभरपाईच्या निकषांवर सवाल
उपोषणकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी संदेश राणे यांनी नुकसानभरपाईच्या निकषांबाबत प्रश्न उपस्थित केला. सहा गुंठे क्षेत्रात सात हजार केळीची लागवड केल्याचे सांगितले जात असताना अशा प्रकरणांत सरसकट नुकसानभरपाई कशी दिली जाते? अशी विचारणा त्यांनी केली. नुकसानभरपाई निश्चित करताना प्रत्यक्ष लागवड, क्षेत्र आणि नुकसानीची पडताळणी नेमकी कशी केली जाते, याबाबत स्पष्टता देण्याची मागणीही या चर्चेतून पुढे आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान उपोषणकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तुमची रानटी पशू येथून घेऊन जावा. आमचे नुकसानच झाले नाही तर नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी ठाम भूमिका घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी केली. अखेर उपस्थित अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








