
देवगड : शिवलग्नाचा मंगल सोहळा आणि शिवकळेसोबत सोने लुटण्याचा दिव्य क्षण अनुभवताना मिठबावसह परिसरातील गावांच्या गावरयतेचे उर अभिमानाने भरून आले.विजयादशमीच्या मंगल पर्वावर शिवकळा, देवतरंग, बारापाच मानकरी, देवसेवेकरी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा पारंपरिक सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. शिव आणि शक्तीच्या मनोमिलनाचा मंगल क्षण तसेच देवतरंगांच्या सान्निध्यात सोने लुटण्याची संधी मिळाल्याने गावरयतेचा आनंद द्विगुणित झाला.
मिठबाव, तांबळडेग आणि कातवण ही गावे महसुली दृष्टीने वेगळी झाली असली, तरी ग्रामदैवत श्री देव रामेश्वराच्या दरबारात ही सर्व गावरयत एकाच दैवी नात्याने जोडलेली आहे. याच धार्मिक एकात्मतेचे दर्शन विजयादशमीच्या उत्सवात घडले. शिवकळेच्या आदेशानुसार बारापाच मानकरी आणि गावरयत दसरा उत्सवासाठी एकत्र आली.
सर्वपित्री अमावस्येला शिवकळेसह सर्व देवतरंग गावरयतेला सोबत घेऊन सागरतीर्थावरील श्री देवी गजबादेवी मंदिरस्थळाकडे मार्गस्थ झाले. दहा दिवसांचा मुक्काम पूर्ण करून विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी चारच्या सुमारास शिवकळा आणि देवतरंग शिवलग्न सोहळा व सोने लुटण्याच्या कार्यक्रमासाठी मिठबाव येथील पारंपरिक आपटापार येथे दाखल झाले.
या प्रवासादरम्यान पेडणेकरवाडी वेताळ देवस्थान,भंगसाळ महापुरुष स्थळ , हरिबाचीवाडी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर, आडारीवाडी येथील खाडिलकर निवास, उत्कटवाडी गणपती मंदिर येथे भेट दिली.तर डगरेवाडी कुलस्वामी मंदिर, फाटकवाडी भवानी मंदिर,येथे उपस्थित रयतेला आशीर्वाद दिला.
त्यानंतर शिवकळेसह सर्व देवतरंग, बारापाच मानकरी, देवसेवेकरी आणि हजारो गावरयत आपटापार येथे एकत्र आली.आपटावृक्षाची पूजा अन् शिव-शक्तीचे मंगल मिलन आपटापार येथे आपटावृक्षाभोवती शिवकळेसह सर्व देवतरंगांनी तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर यजमानी श्री (मिराशी पटेल) राणे यांच्या हस्ते आपटावृक्षाची विधिवत पूजा करण्यात आली. पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर शिव आणि शक्तीच्या मनोमिलनाचा, अर्थात शिवलग्नाचा मंगल सोहळा दिमाखात पार पडला.
शिवलग्नानंतर शिवकळेसोबत पारंपरिक सोने लुटण्याचा कार्यक्रम सुरू झाला. देवतरंगांच्या सान्निध्यात गावरयतेला सोने लुटण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. श्रद्धा, परंपरा आणि गावांच्या एकजुटीचे दर्शन घडविणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरला.
देवदर्शन, आशीर्वाद आणि गुळपाणी कार्यक्रम
आपटापार येथील सोहळा संपल्यानंतर देवस्वारीचा पुढील प्रवास सुरू झाला. श्री देव रामेश्वराने सावंतवाडी येथील उपाध्ये सोमण निवासस्थान,विजय काळे यांच्या निवासस्थान,यानंतर बारापाच पूर्वज, सातेरी देवी,जोगल कुलस्वामी मंदिर या ठिकाणी भेट दिली तर श्री स्वामी समर्थ मठ,देवी काळंबादेवी, लोके कुलस्वामी मंदिर मार्ग , फाटक कुलस्वामी मंदिर याठिकाणी उपस्थित रयतेला आशीर्वाद दिले. देवतरंगांची विधिवत पूजा, ओटी भरणे आणि गावरयतेला गुळपाणी देण्याचा कार्यक्रम पार पडला. नियोजित मार्गावरील देवस्थानांना भेटी देण्यात आल्या. रात्री बारा वाजता देवतरंग, बारापाच मानकरी, देवसेवेकरी आणि गावरयतेसह देवस्वारी श्री देव रामेश्वराच्या दरबारात पुन्हा दाखल झाली.
विजयादशमीच्या या उत्सवातून मिठबाव, तांबळडेग आणि कातवण या गावांमधील धार्मिक एकात्मता, परंपरेविषयीची श्रद्धा आणि ग्रामदैवताशी असलेले अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शिवलग्न सोहळा आणि सोने लुटण्याच्या मंगल क्षणांनी संपूर्ण गावरयतेत भक्तिमय आनंदाचे वातावरण निर्माण केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








