
वैभववाडी : गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विद्यामंदिर कोकीसरे-नारकरवाडी येथील शिक्षिका संध्या संदीप शेळके यांना प्रदान करण्यात आला. कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. शेळके या गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याबरोबरच मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. इंग्रजी विषयावरील त्यांचे प्रभुत्व, अध्यापनातील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला आहे.शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गुरुकुल एज्युकेशन सोसायटीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, जिल्हा परिषद सदस्य गुरुनाथ सडवेलकर आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर ,यासह गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सौ. शेळके यांचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक तसेच विविध स्तरांतून सौ.शेळके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










