
देवगड : आपण रोज जे अन्न खातो, ते पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्ट घ्यावे लागतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना लहानपणापासून झाली पाहिजे. आजचा तरुण वर्ग शेतीपासून दूर जात असून गुरांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत यांत्रिकी शेतीचा स्वीकार करून तरुणांनी पुन्हा शेतीकडे वळावे, हा संदेश 'बांधावरची शाळा' या उपक्रमातून गेली अनेक वर्षे देण्याचा प्रयत्न कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केला जात आहे असल्याचे प्रतिपादन कुणकेश्वरचे प्रशासक सरपंच महेश ताम्हणकर यांनी केले.
कुणकेश्वर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळा, कुणकेश्वर नं १ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी १ जुलै रोजी 'बांधावरची शाळा' हा उपक्रम राबविला जातो. यंदा मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार सोमवार, ६ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम पार पडला.या उपक्रमा दरम्यान सरपंच महेश ताम्हणकर, मुख्याध्यापक तात्या लवटे, अमृता पाटील, पल्लवी ढेरे, अनिल साईम, सत्यवान साईम, दीपा साईम, प्रमिला साईम तसेच ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक तात्या लवटे यांनी सांगितले की, भारत हा कृषिप्रधान देश असूनही अनेक तरुणांनी शेतीकडे पाठ फिरवून शहरांचा मार्ग स्वीकारला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच शेतीविषयी आत्मीयता आणि आदर निर्माण व्हावा, यासाठी 'बांधावरची शाळा' हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. यांत्रिकी शेतीमुळे शेती अधिक सुलभ होत असून शेतीमालावर आधारित विविध उद्योग उभारण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. शेती हा केवळ व्यवसाय नसून आनंद देणारा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला जीवनमार्ग आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
उपक्रमादरम्यान जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी कुणकेश्वर येथील साईम बंधू यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष भातलावणीचा अनुभव घेतला. तसेच पॉवर टिलरच्या साहाय्याने नांगरणी कशी केली जाते, हे प्रत्यक्ष पाहिले आणि त्यामध्ये सहभागी होण्याचा आनंदही लुटला. सरपंच महेश ताम्हणकर यांनी स्वतः विद्यार्थ्यांसमवेत पॉवर टिलर चालवून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना शेतीविषयी प्रेरित केले.शाळेचे मुख्याध्यापक तात्या लवटे यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, पालक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.










