
पर्यटन केंद्र व अत्याधुनिक नाट्यगृहाचे भूमिपूजन; देवगड–ओरस ४० मिनिटांचा मार्ग, बोटबांधणी प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि पर्यटन विकासाबाबत मोठ्या घोषणा
देवगड : "देवगडवर अन्याय कधीही सहन करणार नाही. गेल्या बारा वर्षांत देवगडकरांनी केलेली प्रत्येक रास्त मागणी पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आज मी आमदार आणि राज्याचा कॅबिनेट मंत्री तुमच्या मतांच्या बळावर आहे. त्यामुळे देवगडच्या विकासासाठी जे काही आवश्यक आहे ते करण्यास शासन कटिबद्ध आहे," असे प्रतिपादन पालकमंत्री तथा आमदार नितेश राणे यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देवगड शहरात उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक पर्यटन केंद्र व नाट्यगृहाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती घोडभिसे, तहसीलदार वैशाली जाधव, नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, अधीक्षक अभियंता दिनेश कुमार बागुल, उपअभियंता शैलेश मोरसकर, सहाय्यक अभियंता प्रणव देसाई, कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण नवपुते, भाजप तालुकाध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, राजा भुजबळ, उपसभापती अमोल लोके, वैभव करंगुटकर, योगेश चांदोस्कर तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाषणात राणे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितले की, "ज्यांना देवगडचा विकास पाहवत नाही तेच लोक सातत्याने टीका करत आहेत. दहा वर्षांपैकी आठ वर्षे ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी देवगडमध्ये मोठे उद्योग किंवा रोजगाराचे प्रकल्प का आणले नाहीत, याचा हिशोब जनतेला द्यावा." त्यांनी जलसमाधी आंदोलनाचाही उल्लेख करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. "प्रकल्पासाठी कोणतीही जागा निश्चित झालेली नाही. मुख्यमंत्री यांनीही विधानसभेत याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पाची चर्चा आता संपली आहे. उगाच अफवा पसरवून देवगडचे वातावरण आणि प्रतिमा खराब करू नका. गुंतवणूकदार विकासाचे वातावरण पाहून निर्णय घेतात," असे त्यांनी सांगितले.
देवगडमध्ये आधुनिक चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून सुसज्ज नाट्यगृहाची सातत्याने मागणी होत होती. आता या प्रकल्पामुळे वर्षभरात आधुनिक नाट्यगृह उपलब्ध होईल. मुंबई, पुणे किंवा कोल्हापूरला जाऊन पाहावी लागणारी दर्जेदार नाटके आता देवगडमध्येच पाहता येतील. पर्यटन केंद्रामुळे सांस्कृतिक उपक्रमांनाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देवगड-जामसंडे परिसराला आदर्श शहर बनविण्याच्या उद्देशाने गेल्या बारा वर्षांत चित्रपटगृह, पर्यटनस्थळांचा विकास, क्रीडा संकुल, अभ्यासिका, नाट्यगृह आणि पर्यटन केंद्र अशा अनेक विकासकामांना गती दिल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटकांची वाढती संख्या स्थानिक बाजारपेठ, व्यापार आणि रोजगारासाठी लाभदायक ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
"आज सिंधुदुर्गातील अनेक युवक गोव्यात नोकरी करतात. मतदानासाठी त्यांना सुट्टी मिळावी म्हणून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करावी लागते. आपल्या भागात उद्योग उभे राहिले असते तर ही वेळ आली नसती. मला शिव्या देऊन देवगडच्या तरुणांना नोकऱ्या मिळत असतील, तर त्या शिव्याही मी स्वीकारायला तयार आहे," असे सांगत त्यांनी रोजगारनिर्मितीवर भर देण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली.
देवगडमध्ये दोन बोटबांधणी प्रकल्प उभारले जाणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज विरोध करणारेच उद्या आपल्या मुलांसाठी नोकऱ्या मागायला येतील, असा टोला त्यांनी लगावला.
देवगड ते ओरस हे अंतर अवघ्या ४० मिनिटांत पार करता येईल असा नवीन रस्ता उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. आनंदवाडी बंदर प्रकल्पासाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर व्यापार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे संकेत देताना वेळागर येथे दोन वर्षांत ताज हॉटेल उभारले जाणार असून भविष्यात देवगडमध्येही ताज हॉटेलचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
"माझे आणि देवगडकरांचे नाते हे राजकारणाचे नसून कौटुंबिक आहे. देवगडचा आमदार आता मंत्री आहे. त्यामुळे विकासासाठी जे हवे ते मागा, मी देण्यासाठी बसलो आहे. माझे नाव नितेश नारायण राणे आहे. थांबणे माझ्या स्वभावात नाही. जितका विरोध होईल तितक्या जोमाने मी देवगडच्या विकासाची रेषा मोठी करत राहीन," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले की, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक पर्यटन केंद्र व नाट्यगृहाचे काम दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण होईल. देवगडच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे हे नाट्यगृह कलाकार, नाट्यप्रेमी आणि पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी सांगितले की, देवगडमध्ये वाढणाऱ्या पर्यटनाला पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. व्यावसायिक व प्रायोगिक नाटके, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक कलाकारांना यामुळे हक्काचे व्यासपीठ मिळेल.
यावेळी अधीक्षक अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ अंतर्गत देवगड शहरातील शासकीय जागेवर सुमारे ५ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. तळमजल्यावर वाहनतळ, पहिल्या मजल्यावर ४५० ते ५०० प्रेक्षक क्षमतेचे सुसज्ज नाट्यगृह व कला दालन, उपहारगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अंतर्गत विद्युत व्यवस्था, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार आणि परिसर सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांचा कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, युथ फोरम देवगड, प्रमोद नलावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऋतिक धुरी यांनी केले.










