LIVE UPDATES

सावंतवाडी तालुक्यात पावसाच थैमान !

ग्रामीण भागात मोठी हानी ; तात्काळ पंचनामे | प्रशासन सुट्टी दिवशीही 'ऑन फिल्ड'
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: July 05, 2026 21:13 PM
views 179  views

सावंतवाडी : तालुक्यातील सांगेली, आरोस-दांडेली, निगुडे, ओटवणे, आंबोली, चौकुळ गावात वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पडझड, नुकसानी झाली. यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले असून रविवारी सुट्टी दिवशी देखील महसूल यंत्रणा पंचनामे करण्यासाठी 'ऑन फिल्ड' कार्यरत होती. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी चौकुळ, सांगेलीसह इतर नुकसानग्रस्त भागाची जातीनीशी पाहणी करत नुकसानग्रस्तांना धीर दिला. 

सांगेली येथील विष्णू सोमा राऊळ यांच्या घरावर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. राहत्या घरावर मोठे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. घरातील समानासह छप्पर असे जवळपास तीन साडेतीन लाखांच्या घरात हे नुकसान पोहचले आहे‌‌. तसेच अजून काही ठिकाणी घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत घरावर पडलेले झाड बाजूला करण्यास मदत केली. तसेच तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांनी पाहणी करत नुकसानीचे पंचनामे केले. तसेच ४ जुलै रोजी चौकुळ येथील तब्बल ३ घरे पूर्णतः कोसळली असून २७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच सांगेली येथेही १ घर पूर्णपणे पडल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

तसेच आरोस-दांडेली परिसरात मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कै.भाऊ पांगम सभागृहाच्या इमारतीवरही वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. इमारतीसमोर असलेल्या जुनाट वडाच्या झाडाची रात्रीच्या वेळी भलीमोठी फांदी तुटून थेट सभागृहासमोर कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने परिसरात विद्यार्थी किंवा कर्मचारी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.तसेच दांडेली येथील शेतकरी अमोल पुनाळेकर आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बागायतदारांना सुद्धा या वादळाचा तडाखा बसून त्यांची सुपारी झाडे, आंबा,केळी,साग,फणस, फळझाडे या वादळामुळे जमीन दोस्त होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने विद्युत तारांचेही नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले आहे. 

निगुडे येथे देवकी वासुदेव गावडे यांच्या घरावर आणि गोठ्यावर झाड पडून लाखोंचे नुकसान झाले आहे. आंबोली गडदुवाडी येथील बाळकृष्ण गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडले. तर ओटवणे येथील रामकृष्ण धनाजी गावकर यांच्या घरावर सागाचे झाड पडून आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या बाधित क्षेत्राची पाहणी केली जात असून महसूल विभागामार्फत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रशासकीय मदत दिली जाईल अशी माहिती सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.