LIVE UPDATES

गोवा दारू वाहतूक प्रकरणाची सखोल चौकशी करा | संबंधितांवर कारवाईची मागणी

अॅड. प्रसाद करंदीकर यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: July 06, 2026 21:21 PM
views 56  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातून होणाऱ्या अवैध दारू वाहतूक व विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. प्रसादजी करंदीकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किमतीची गोवा दारू जप्त करून कारवाई केली असली, तरी या कारवाईतून केवळ वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होत असून मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात यश येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे बेकायदेशीर दारू विक्री करणारे, परवान्याविना दारू खरेदी-विक्री करणारे तसेच या संपूर्ण रॅकेटमागील प्रमुख आरोपी यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे.

तसेच, अशा प्रकारची वाहने महाराष्ट्रातील विविध तपासणी नाक्यांमधून कशी पुढे जातात, याचीही सखोल चौकशी व्हावी. तपासणी नाक्यांवरील संबंधित कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्यास त्यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.