LIVE UPDATES

'त्या' आंदोलनानंतर प्रशासनाला जाग

वाभवे कोंडवाडीसह शहरातील खड्डे बुजवण्यास प्रारंभ
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 13, 2026 19:29 PM
views 34  views

वैभववाडी : वाभवे कोंडवाडी येथे खड्ड्यामुळे झालेल्या रिक्षा अपघातानंतर संतप्त नागरिकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या खड्ड्यासह इतर खड्डे काँक्रीट टाकून बुजविण्यास सुरुवात केली आहे.

वैभववाडी-सडूरे मार्गावरील वाभवे कोंडवाडी येथे शुक्रवारी दुपारी रिक्षा अपघात झाला.यात तिघेजण जखमी झाल्यानंतर वाभवे कोंडवाडी, नावळे, सांगुळवाडी, अरुळे, निमअरुळे आणि सडूरे परिसरातील नागरिक आक्रमक झाले होते. खड्ड्यांमुळेच अपघात झाल्याचा आरोप करत त्यांनी अपघातस्थळीच तब्बल तासभर रास्ता रोको आंदोलन छेडले होते.

घटनास्थळी पोहोचलेल्या नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. यावेळी सोमवारपर्यंत खड्डे बुजविण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते.दरम्यान, आश्वासनानुसार  वाभवे कोंडवाडी येथील धोकादायक खड्ड्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आली. बांधकाम सभापती रणजित तावडे यांनी स्वतः कामाची पाहणी केली. अपघातस्थळासह शहरातील इतर रस्त्यांवरील खड्डेही बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे . त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.