
वैभववाडी : उंबर्डे सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी वाडीत जाणारा रस्ता होण्यासाठी सुरू केलेले उपोषण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित केले. उपसभापती साची कोलते आणि पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी यासाठी पुढाकार घेत यशस्वी मध्यस्थी केली.
पंचायत समिती कार्यालयासमोर उंबर्डे सुतारवाडी येथील ग्रामस्थ सकाळपासून रस्त्याच्या मागणीकरिता उपोषणाला बसले होते. यासंदर्भात सकाळी उपोषणकर्ते व पदाधिकारी यांची पंचायत समितीच्या कार्यालयात सकाळी चर्चा झाली.मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे त्यांचं उपोषण सुरू होत.अखेर दुपारनंतर उपसभापती साची कोलते, प.स. सदस्य मंगेश लोके तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची येत्या काही दिवसांत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीत संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे निर्माण झालेला तणाव काही प्रमाणात निवळला आहे. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, सरपंच वैभवी दळवी, विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर, पोलीस पाटील विजय दळवी , उपोषणकर्ते सुप्रसाद पांचाळ,विजय पांचाळ, शशिकांत पांचाळ, शुभम पांचाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.










