
वैभववाडी : गणेशोत्सवासाठी तालुक्यात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होणार असल्याने प्रशासनाने विविध उपाययोजनांचे नियोजन सुरू केले आहे. गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस, आरोग्य, नगरपंचायत, बांधकाम आदी सर्व विभागांनी परस्परांमध्ये समन्वय व सातत्याने संवाद ठेवावा. तसेच गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तहसील कार्यालयात शांतता समितीची बैठक झाली. तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, प्रभारी गटविकास अधिकारी स्नेहा माने, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पोटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात हजारो चाकरमानी तालुक्यात येतात. त्यामुळे त्यांच्या प्रवासापासून ते दर्शन आणि परतीच्या प्रवासापर्यंत कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसीलदार पाटील यांनी दिल्या. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आगाऊ नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अर्जुन रावराणे विद्यालय, तहसील कार्यालयालगतचे मैदान, इनामदार प्लाझा, सांगुळवाडी मार्ग आणि फोंडा मार्ग या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी निर्धारित ठिकाणीच वाहने उभी करावीत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सव काळात आरोग्य विभागही सज्ज राहणार आहे. करूळ तपासणी नाका, वैभववाडी बसस्थानक, वैभववाडी रेल्वे स्थानक आणि भुईबावडा बाजारपेठ या चार ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहेत.रेल्वे किंवा बसने प्रवास करून आलेले चाकरमानी थकलेले असतात. त्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी कमीत कमी वेळेत व सुलभ पद्धतीने कशी करता येईल, याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे, अशी सूचना तहसीलदार पाटील यांनी केली.
गणेशोत्सवापूर्वी रेल्वे फाटकाजवळील खड्डे, वैभववाडी-फोंडा मार्गावरील खड्डे तसेच शहरातील आणि अन्य प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. रस्त्यालगत वाढलेली झाडीही हटवावी, अशा सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या.
रेल्वे स्थानकातून तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच शहरातून गावांकडे जाणाऱ्या रिक्षांचे निश्चित भाडे प्रवाशांना स्पष्टपणे समजावे, यासाठी दरफलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या फलकावर जबाबदार व्यक्तीचा मोबाईल क्रमांक नमूद करण्यासह दरफलकाची माहिती विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित करण्याचेही सांगण्यात आले.
रिक्षा संघटनेचे पदाधिकारी सचिन तळेकर यांनी आरटीओकडून रिक्षांचे भाडेदर निश्चित करण्यात आले असून, त्यासंदर्भातील बॅनर विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठविण्यात आल्याची माहिती दिली. कोणत्याही प्रवाशाकडून निश्चित दरापेक्षा अवास्तव भाडे आकारू नये, असे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव काळातील शहराच्या नियोजनाबाबत नगरपंचायतीच्या प्रतिनिधींनी माहिती दिली. शहरात व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी निश्चित जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, वाहनतळाचेही स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्व विभागांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे. तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री.पाटील यांनी केले.










