LIVE UPDATES

Sindhudurg Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

चाकरमान्यांमुळे साथरोगाचा धोका : जिल्ह्यात १८ ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 04, 2026 20:01 PM
views 54  views

सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, गोवा आदी शहरांतून मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून साथरोगांचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. १० ते १३ सप्टेंबर तसेच १६ व १७ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि चेकपोस्ट अशा १८ महत्त्वाच्या ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही पथके कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.

सिंधुदुर्गातील मोठ्या संख्येने नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, गोवा यासह अन्य शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त हे चाकरमानी एसटी, रेल्वे तसेच खासगी वाहनांनी आपल्या गावी परततात. मात्र, ते ज्या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत, त्या ठिकाणी डेंग्यू, हिवताप, लेप्टोस्पायरोसिस आदी आजारांचा प्रादुर्भाव असल्यास त्याचा संसर्ग जिल्ह्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशोत्सव काळात आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क ठेवण्यात आली आहे.

कणकवली, सावंतवाडी रोड, वैभववाडी, कुडाळ आणि सिंधुदुर्ग या रेल्वे स्थानकांवर, तसेच मालवण, वेंगुर्ला, कणकवली, वैभववाडी, देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग व कुडाळ बसस्थानकांवर वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय आंबोली, फोंडाघाट, खारेपाटण, करूळ चेकपोस्ट आणि जिल्हा परिषद दवाखाना भुईबावडा येथेही आरोग्य पथके कार्यरत राहणार आहेत.

ही पथके सकाळी ८ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ८ अशा दोन सत्रांत काम करणार आहेत. प्रवाशांची आरोग्य तपासणी, तापाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची प्राथमिक तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

दरम्यान, चाकरमानी तसेच स्थानिक नागरिकांनी ताप, अंगदुखी, थंडी वाजणे, डोकेदुखी किंवा अन्य संशयास्पद लक्षणे जाणवताच दुर्लक्ष न करता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.