
वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेचा आतापर्यंतच्या कार्याचा आढावा पाहता शासनाच्या नमो उद्यान योजनेअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने साकारलेले "नमो उद्यान" कोकण विभागातील उत्कृष्ट उद्यान ठरेल असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केला.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माध्यमातून व शासनाच्या योजनेतून साकारण्यात आलेल्या नमो उद्यानाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसीलदार ओंकार ओतरी, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी यांच्यासहित सर्व नगरसेवक, न. प. चे अधिकारी, कर्मचारी, भाजप शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
पुढे पालकमंत्री म्हणाले, “नियोजनबद्ध काम, कोणताही वायफळ गाजावाजा न करता केवळ कामावर लक्ष केंद्रित करणे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे, हे वेंगुर्ला नगरपरिषदेचे वैशिष्ट्य आहे. नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि त्यांची संपूर्ण टीम यासाठी कौतुकास पात्र आहे,” वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विकासकामांचा दर्जा चांगला असून, आता त्यामध्ये आणखी नाविन्यपूर्ण संकल्पना आणून पर्यटन विकासाला चालना देण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांसाठी सुमारे २५ महत्त्वाचे पर्यटन स्पॉट विकसित करण्याचे नियोजन असून, त्यातील अनेक ठिकाणे वेंगुर्ला तालुक्यात असू शकतात. पर्यटक जिल्ह्यात आल्यानंतर त्याला विविध पर्यटनस्थळांवर घेऊन जाण्यासाठी आणि स्थानिक बाजारपेठेला त्याचा फायदा होण्यासाठी नगरपरिषदेने नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत, असे राणे यांनी सांगितले.
नवीन संकल्पना आणा, आर्थिक पाठबळ देऊ : नितेश राणे
“जगात आणि राज्यात काय नवीन घडत आहे, त्याचा अभ्यास करा. चांगल्या संकल्पना वेंगुर्ल्यासाठी आणा. तुम्हाला जे आर्थिक पाठबळ लागेल, ते निश्चितपणे देण्याचा प्रयत्न केला जाईल,” असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी दिला.
राज्य शासनाने नमो उद्यानाच्या निर्मितीसाठी नगरपरिषद व नगरपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला असून, विहित मुदतीत उद्यानाचे काम पूर्ण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोकण विभागासाठी प्रथम क्रमांकाला पाच कोटी, द्वितीय क्रमांकाला तीन कोटी आणि तृतीय क्रमांकाला दोन कोटी रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेने निर्धारित मुदतीत शासनाच्या निकषांची पूर्तता करत उद्यानाचे काम पूर्ण केले आहे.
निसर्ग आणि उद्यानाचा सुंदर मेळ : दीपक केसरकर
आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ल्याच्या नमो उद्यानाचे विशेष कौतुक केले. वेंगुर्ल्याला निसर्गाने ओहोळच्या स्वरूपात दिलेली देणगी आणि त्याच्या शेजारी साकारलेले हे उद्यान यांचा सुंदर मेळ क्वचितच एखाद्या ठिकाणी पाहायला मिळतो, उद्यानाची रचना आणि त्यामध्ये केलेली कल्पकता ही वेंगुर्ल्याच्या क्रमांकासाठी निश्चितच महत्त्वाची ठरेल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते या नमो उद्यानाचे कंत्राटदार एस एल ठाकूर, नमो उद्यान मध्ये विविध शिल्प बनवणारे व कमान बनवणारे टी. जे. कांबळे तसेच नगर अभियंता श्री. होडावडेकर, श्री. परुळेकर व सागर चौधरी यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.
यावेळी प्रास्ताविकात बोलताना नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले, वेंगुर्ला शहरापासून काहीसे दूर असलेल्या भटवाडी परिसरातील नागरिकांना शहराच्या विकासापासून दूर असल्याची भावना निर्माण होऊ नये, या उद्देशाने या ठिकाणी नमो उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना विरंगुळा आणि आरोग्यासाठी चांगली जागा उपलब्ध झाली असून, परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे.
उद्यानालगत असलेल्या छोट्या नदीच्या माध्यमातून भविष्यात पाणी अडवून जलसंधारण करण्याचाही नगरपरिषदेचा मानस आहे. मागील पाच वर्षांत ज्या कामांचा शुभारंभ केला, त्यांची उद्घाटनेही आपल्या कार्यकाळात करण्याचा संकल्प नगरपरिषदेने केला होता आणि तो पूर्ण केला. यावेळीही पहिल्या सहा महिन्यांत सुरू केलेल्या कामाचे पहिले उद्घाटन नमो उद्यानाच्या माध्यमातून झाले आहे. आगामी साडेचार वर्षांतही विकासकामांचा हा वेग कायम राहील, असा विश्वास नगराध्यक्ष गिरप यांनी व्यक्त केला.
“मी आणि माझी नगरसेवकांची टीम, वेंगुर्ल्याची जनता तसेच मंत्री नितेश राणे व आमदार दिपकभाई आमच्या पाठीशी असताना आम्हाला कशाचीही भीती नाही. आम्ही विकास करणारी माणसे आहोत आणि वेंगुर्ल्याला विकासात एक नंबरला नेण्यासाठी सातत्याने काम करू,” असा निर्धारही दिलीप गिरप यांनी व्यक्त केला.










