LIVE UPDATES

साटेली-भेडशी उपसरपंचांच्या ग्रामस्थही विरोधात, अखेर झाल्या पायउतार

१७७ ग्रामस्थांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने, तर ७५ ग्रामस्थांचे विरोधात मतदान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 04, 2026 20:48 PM
views 178  views

दोडामार्ग : साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्याविरोधात सरपंचांसह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाला अखेर ग्रामस्थांनीही कौल दिला आहे. आज झालेल्या विशेष ग्रामसभेत बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण ३८३ ग्रामस्थांनी मतदान केले. त्यापैकी १७७ ग्रामस्थांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने, तर ७५ ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.

तब्बल १३१ मते बाद ठरली. त्यामुळे अविश्वास ठरावास ग्रामस्थांची संमती मिळाल्याने उपसरपंच सुमन डिंगणेकर यांना अखेर पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. साटेली-भेडशीसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि दोडामार्ग तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये घडलेल्या या घडामोडीने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत यापूर्वीच अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आजच्या विशेष ग्रामसभेतील ग्रामस्थांचा कौल हा या संपूर्ण प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरला. आजच्या विशेष सभेस तहसीलदार दोडामार्ग राहुल गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली

पंचायत समिती दोडामार्गचे अध्यासी अधिकारी तथा सहायक गटविकास अधिकारी यशवंत भिवा गवस यांच्या अध्यक्षतेखाली सचिव तथा ग्रामपंचायत अधिकारी ज्योती डोंगरदिवे यांनी काम पाहिले. शिवाय ग्रामपंचायत परिसरात पोलिस फौजफाटा देखील उपस्थित होते. 

३८३ ग्रामस्थांचा मतदानात सहभाग 

आज झालेल्या विशेष ग्रामसभेत उपसरपंचांविरोधातील अविश्वास ठरावावर ग्रामस्थांचा कौल घेण्यात आला. यासाठी बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. मतदानानंतर मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीअंती ३८३ मते पडली. त्यापैकी १७७ मते अविश्वास ठरावाच्या बाजूने, ७५ मते अविश्वास ठरावाच्या विरोधात, तर १३१ मते बाद ठरली. त्यामुळे ठरावाच्या बाजूने ग्रामस्थांची संमती असल्याचे स्पष्ट झाले.