
वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रतिष्ठेच्या 'कृषिभूषण' आणि 'कृषिरत्न' पुरस्काराने गौरविण्यात आलेले वेंगुर्ले येथील ज्येष्ठ नेते, वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व शिवाजी रमाकांत कुबल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी वेंगुर्ले कुबलवाडा येथील निवासस्थानी जाऊन कुबल कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन करून दिवंगत शिवाजीदादा कुबल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. वेंगुर्ला शहराच्या सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्राच्या जडणघडणीत शिवाजीदादा कुबल यांचे योगदान अत्यंत मोठे असून, त्यांच्या निधनाने वेंगुर्ले तालुक्याचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशा शब्दांत वैभव नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.











