LIVE UPDATES

पावशी आणि माणगाव येथे करपलेल्या भातशेतीची वैभव नाईक यांच्याकडून पाहणी

तात्काळ सरसकट भरपाई द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 16:35 PM
views 36  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची झालेली ओढ आणि कडक उन्हामुळे भातशेती मोठ्या प्रमाणावर करपून गेली आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून, या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील पावशी आणि माणगाव येथील नुकसानग्रस्त भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात न झाल्याबद्दल वैभव नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने तात्काळ सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे पूर्ण करून त्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला.

पाहणी दौऱ्यादरम्यान वैभव नाईक यांनी पावशी येथील स्थानिक शेतकरी जयराम वराडकर, न्हानु तोटकेकर, राजन तवटे आणि किशोर तवटे यांच्या करपलेल्या भातशेतीची पाहणी करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर माणगाव कुंभारवाडी येथे शेतकरी पांडुरंग कुंभार तसेच माणगाव कोठीची राई येथे हर्षद धुरी, सुभाष धुरी व उमेश देसाई यांच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

पावशी येथील पाहणीवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, बाळा पावसकर, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, माजी उपसभापती जयभारत पालव, सुशील चिंदरकर, बाळू पालव, पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, ग्रा. प. सदस्य काका भोगटे, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत कुंभार, मनीष तोटकेकर, दादा खोत, बंड्या खोत, बाबू वायंगणकर, प्रसाद शेलटे, अमित राणे, सचिन ठाकूर, शैलेश काळप आदी उपस्थित होते.

माणगाव येथील पाहणीवेळी कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती गटनेते योगेश धुरी, माणगाव सरपंच सौ. मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, विभाग प्रमुख एकनाथ धुरी, उपविभाग प्रमुख शैलेश शिरोडकर, नानेली ग्रा. प. सदस्य विनय कदम, माणगाव ग्रा. प. सदस्य संदीप सावंत, ईश्वरी सावंत, काजल नाईक आणि बंटी भिसे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.