LIVE UPDATES

‘कोमसाप’च्या १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ‘ध्वज’ व ‘बोधचिन्हा'चे अनावरण

२७ ते २९ नोव्हेंबर मालगुंडमध्ये साहित्यकुंभ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 14, 2026 18:44 PM
views 40  views

रत्नागिरी : "कोकणच्या मातीत शब्दांना निसर्गाचा गंध आणि समुद्राच्या लाटांची गाज असते. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचं आणि जगण्याचा खरा अर्थ शिकवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यातच आहे," असे भावस्पर्शी प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.

मराठी साहित्याला 'तुतारी' फुंकून नव्या युगाची पहाट दाखवणाऱ्या आधुनिक मराठी काव्याचे जनक, कवी केशवसुतांच्या पावन जन्मभूमीत मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १८ व्या मध्यवर्ती कोकण मराठी साहित्य संमेलनाचा ‘ध्वज’ आणि ‘बोधचिन्ह’ जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रदीप ढवळ, १८ वे मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन कार्यवाह गजानन पाटील, कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, शिक्षणाधिकारी माध्यमिक दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, शिक्षण विस्तार अधिकारी महेश कांबळे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी आदी उपस्थित होते. 

कोकण मराठी साहित्य परिषदेचे हे ऐतिहासिक १८ वे मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन २०२६ येत्या २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे होणार आहे. कवी केशवसुत स्मारकाच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या या ज्ञानपीठात राज्यभरातून नामवंत साहित्यिक, कवी, समीक्षक आणि रसिक वाचक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

साहित्य माणसाला जगण्याचा विचार देते आणि जगणे सुंदर करते. त्यामुळे साहित्य संमेलने ही केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण भागात तळागाळापर्यंत व नव्या पिढीतील तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असे विचार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी व्यक्त केले.

'कोमसाप'ने गेल्या ३५ वर्षांच्या प्रवासात मॉरिशस आणि कॅनडासारख्या देशांमध्येही संमेलने घेऊन आपली ओळख वैश्विक स्तरावर निर्माण केली आहे. १९९१ मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कवी केशवसुतांच्या स्मारकाची उभारणी आणि 'कोमसाप'च्या स्थापनेचा संकल्प याच भूमीतून सोडला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.

तरुणांच्या हातात लेखणी यावी आणि त्यांनी साहित्याच्या माध्यमातून आपली मते व्यक्त करावीत, हाच अशा संमेलनांचा मूळ हेतू असल्याचे कीर यांनी स्पष्ट केले. आगामी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके असल्याने, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात साहित्य आणि विज्ञानाची उत्तम सांगड या संमेलनातून घातली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"वर्गखोल्या आणि अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन नवी पिढी घडवण्यासाठी साहित्य व वाचनाचे संस्कार रुजवणे अत्यंत आवश्यक आहे," असे ठाम मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे ही अभिमानास्पद बाब ठरली असून, त्यानंतर भाषेचा जागर राज्यभरात अधिक वेगाने सुरू आहे.

परिवहन विभाग व मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने सुमारे १ लाख ६० हजारांहून अधिक अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दैनंदिन वापरासाठी सुलभ मराठी शिकवण्याचा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला.